आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकाळी साडेपाचशे एटीएम सुरू, रात्री साडेतीनशेमध्ये ठणठणाट!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराची आर्थिक गाडी बऱ्यापैकी रुळावर आली असून सोमवारी ५५० एटीएम सुरू झाले होते. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे सकाळच्या सत्रात बँकांमध्ये काही प्रमाणात गर्दी झाली होती. अडीच हजार रुपयांपर्यंत रोकड काढता येत असल्याने ज्यांना जास्त रक्कम हवी त्यांनी बँकेना प्राधान्य दिले. तर जास्त एटीएम उघडले गेल्याने तेथील गर्दीही कमी झाल्याचे चित्र होते. बँकेत पैसे भरण्यापेक्षा पैसे काढण्यासाठीच गर्दी होती. मात्र ती दुपारनंतर ओसरली. एक्स्चेंज काउंटरवर पैसे बदलणाऱ्या लोकांचे प्रमाणही घटले आहे.
गेल्या काही दिवसांत लोकांनी त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकेत मोठ्या प्रमाणात जमा केल्या आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी पैसे काढण्यासाठी लोक बँकेत पोहोचले. बँकांकडे दोन हजारांच्या नोटा अधिक प्रमाणात असल्याने ग्राहकांना या नोटांचे वितरण करण्यात आले. एसबीआयचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनील शिंदे यांनी सांगितले की, सोमवारी बँकांमध्ये पैसे काढणाऱ्यांची संख्या आधिक होती. एटीएम मोठ्या प्रमाणात सुरळीत झाल्यामुळे बँकेवरील ताण कमी झाला आहे. तसेच सीडीएममध्येही पैसे भरले जात असल्याने चार-पाच दिवसांत हा ताण आणखी हलका होईल.

बारा तासांपेक्षा अधिक काम
ईपीएसचे चॅनल मॅनेजर सुशील धुळे यांनी सांगितले की, सध्या किमान बारा ते चौदा तास काम करावे लागत आहे. सकाळी नऊपासून कामाला सुरुवात होत असून रात्री बारापर्यंत हे काम सुरू आहे. इंजिनिअर, कस्टोडियन, सिक्युरिटी गार्ड, एजन्सीचे कर्मचारी हे काम करीत आहेत. अधिकारीही पाठपुरावा करतात.

दिवसभर नोटा भरण्याचेच काम
^सकाळीनऊपासूनकेवळ एटीएममध्ये नोटा भरण्याचे काम करीत आहोत. पैसे भरण्यासाठी गाडी आल्याचे दिसताच लोकांच्या रांगा लागणे सुरू होते. -अभिजित निकुंभ, कस्टोडियन

नोटाबंदीनंतर चौपट काम वाढले
^नोटाबंदी निर्णयानंतर आम्हाला चारपट अधिक काम करावे लागत आहे. लोकांचा संताप पाहता आम्ही सर्व एटीएममध्ये पैसे भरण्याचे लक्ष्य पूर्ण करत आहोत. -सुशील धुळे, चॅनल मॅनेजर, ईपीएस

दिवसभरात एकदाच कॅशचा भरणा
एटीएमवर कॉन्फिगरेशन आणि पैसे भरण्याचे काम सहा एजन्सीकडे आहे. २४ तासांत एकदाच एटीएममध्ये पैसे भरले जात आहेत. एखाद्या एटीएममध्ये सकाळी दहा वाजता पैसे भरले गेले तर ते एटीएम साधारणत: सहा ते आठ तासांत रिकामे होत आहे. त्यामुळे सोमवारी रात्री आठपर्यंत शहरातील बंद पडलेल्या एटीएमची संख्या ३५० पेक्षा अधिक होती.

एटीएम सुरू, नागरिकांना दिलासा
शहरातल्या ७०० एटीएमपैकी ८० टक्के एटीएम सोमवारी उघडले गेल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. शहरात सोमवारी सकाळी सहा एजन्सीजच्या माध्यमातून ५५० एटीएममध्ये पैसे भरले गेले. येत्या तीन-चार दिवसांत एटीएम आणखी सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर गर्दी आणखी कमी होईल, असे बेट्राचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.

असा सुरू होतो बँक ते एटीएमचा प्रवास
शहरातसध्या सिक्युअर व्हॅल्यू, सीएमएस, लॉजिक कॅश, ईपीएस, एसआयएस आणि रॉयटर या एजन्सीजच्या माध्यमातून एटीएमच्या कॅसेटमध्ये नोटा भरल्या जातात. सकाळी एजन्सीचे कर्मचारी बँकांकडून कॅश घेऊन बँक सांगेल त्या एटीएममध्ये भरणा करतात. एटीएमवर दोन कस्टोडियन, गार्डच्या उपस्थितीत पैसे भरले जातात. साधारण अर्धा ते एक तास हे काम चालते. त्यानंतर दुसऱ्या एटीएमकडे ते मोर्चा वळवतात. दिवसाआ सरासरी २० एटीएममध्ये पैसे भरले जातात.

कर्मचाऱ्यांना १४ तास काम
एटीएमवर पैसे भरण्यासाठी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १४ तास काम करावे लागत आहे. यामध्ये सुरक्षा रक्षक कस्टोडियन, इंजिनिअर तसेच एजन्सीचे इतर कर्मचारी असे पथक असते. सकाळी नऊ ते रात्री बारापर्यंत एटीएममध्ये पैसे भरणा करण्याचे काम सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...