आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडर्न राहू द्या हो, आधी आहे ते बसस्थानक तरी धड करा; चंद्रकांत खैरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबीस्टार- एअरपोर्टच्या धर्तीवर मध्यवर्ती बसस्थानक मॉडर्न करण्याच्या नुसत्याच गप्पा सुरू आहेत. त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याच्या बाताही झाल्या. पण मॉडर्न दूरच, आहे ते बसस्थानक दुरुस्त केले तरी पुरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण या स्थानकाची अवस्था खूपच खराब झाली आहे. पण मॉडर्न करायचे या नावाखाली त्याची दुरुस्तीच होत नाही. त्यामुळे ते दिवसेंदिवस आणखी खराब होत आहे. एखाद्या खेड्यात असते त्यापेक्षाही त्याची अवस्था बकाल झाली आहे. 

भिंतीचे पोपडे, गळके छत, आवारात पडलेले खड्डे आणि दुर्गंधीमुळे मध्यवर्ती बसस्थानक एक अजब ‘मॉडेल’ बनले आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. एसटी प्रशासनाने आधी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव, मग बसस्थानक परिसरातील ३२ निवासस्थानांच्या दोन इमारती पाडून बस पार्किंगसाठी जागेचा प्रस्ताव. त्यानंतर मॉडर्नायझेशनसाठी ३६ कोटींंचा प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले; पण त्या - त्या वेळी दिलेल्या एकाही प्रस्तावाला यश आले नाही. नूतनीकरणाच्या प्रस्तावाखाली कधी बसस्थानकाची दुरुस्तीही होत नाही. यावर डीबी स्टारने वाचा फोडताच एअरपोर्टच्या धर्तीवर शंभर कोटींच्या मॉडर्न बसपोर्टचे गाजर दाखवले. यावर नियुक्त केलेल्या मुंबईच्या वास्तुविशारदासह वर्षभरापूर्वी केवळ एकदा पाहणीचा सोपस्कार पूर्ण केला. या वर्षभरात एसटी महामंडळाकडून काम सुरू झाले नाही. त्यातच खासदार चंद्रकांत खैरे यांनीही बसस्थानकाची पाहणी केली तेव्हा त्यांनाही या बकालीचा फटका बसला. त्यामुळे त्यांनीही प्रवाशांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी मागणी केली आहे. 
 
लवकरात लवकर दुरुस्ती करा 
-मराठी दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी सालाबादप्रमाणे यंदाही स्थानकावर गेलो होतो. त्या वेळी प्रवाशांनी बसस्थानकाकडे बोट दाखवले. यातच माझा एक पाय येथे जमा झालेल्या घाणीत गेला. अशा अडचणी रोज लोक सहन करतात. हे स्थानक मॉडर्न होईल तेव्हा होईल, निदान आहे ते स्थानक दुरुस्त करून चांगले करा, अशी माझी मागणी आहे.
- चंद्रकांत खैरे, खासदार 
बातम्या आणखी आहेत...