आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर औरंगाबादकरांना मिळू शकतील स्वस्तात 100 बस, लोकप्रतिनिधींची सावध भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुक्त म्हणतात, पांढरा हत्ती घेणार नाही - Divya Marathi
आयुक्त म्हणतात, पांढरा हत्ती घेणार नाही
औरंगाबाद- शहर बस सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या बेस्ट या संस्थेने दहा वर्षे वापरलेल्या १०० बस विक्रीसाठी काढल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेची गरज लक्षात घेता त्यांनी मागणी केली तर अतिशय स्वस्त दरात या बसेस शहराला मिळू शकतील अन् काही दिवसांत शहराच्या रस्त्यावर त्या धावताना दिसतील. यामुळे नागरिकांची सोय होईल तसेच अॅपे, काळीपिवळी, रिक्षाच्या गर्दीतील प्रवासातून मुक्तता होऊ शकेल. महानगरपालिका यासाठी सरसावली अन् बेस्टनेही प्राधान्य दिले तर हे होऊ शकते. अर्थातच यामध्ये अनेक विघ्ने आहेत. स्वत: मनपा आयुक्तांनी अशा जुनाट बस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर सत्ताधारी पक्षाचे आमदार अतुल सावे, पालकमंत्री रामदास कदम, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनीही सावध भूमिका घेतली आहे. 
 
शहरात आजघडीला ५६ बस धावतात. येथील प्रवाशांची गरज लक्षात घेता हे प्रमाण १० टक्केही नाही. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर शहर बस हव्यात यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही एकमत आहे. त्यामुळेच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात आधी प्राधान्य देण्यात आले आहे ते मुळी सिटी बसलाच. पुढील तीन महिन्यांनंतर स्मार्ट सिटीचा प्राधान्यक्रम जाहीर होईल. दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या बेस्ट संस्थेने १०० बस विक्रीस काढल्याची जाहिरात राज्यभर झळकली. 
 
एसटी महामंडळ किंवा एखाद्या शहराने सिटी बससाठी या बस खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला तर अतिशय स्वस्तात या बस देण्यात येतील, असे अनौपचारिकपणे सांगितले आहे. त्याचा फायदा औरंगाबादला व्हावा असे काहींना वाटते. बेस्टच्या विक्रीस निघालेल्या १०० पैकी काही बसेसचे आयुर्मान १० वर्षांचे आहे तर काहींचे त्यापेक्षाही कमी. तेथे वापरायच्या नाहीत तेव्हा आपल्याकडे ठेवण्यापेक्षा जो कोणी याचा वापर करेल, त्याला त्या देऊन टाकायच्या असे त्यांचे नियोजन आहे. 

औरंगाबाद महानगरपालिकेने या बसेस खरेदी केल्या तर आजघडीला त्या रस्त्यावर धावू शकतील. परंतु त्या बसेसची अवस्था कशी असेल, त्यावर खर्च किती येईल, असे प्रश्न लोकप्रतिनिधींना तर पडले आहेत. दुसरीकडे आयुक्त बकोरिया यांनी तर या बसेस कोणत्याही परिस्थितीत आम्ही खरेदी करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महागड्या बस खरेदी करणे शक्य नसलेली महानगरपालिका स्वस्तातील बस घेऊन नागरिकांना सुविधा देते की चांगली सिटी बस हे येथील प्रवाशांचे स्वप्न आणखी काही वर्षे स्वप्नच राहते, हे लवकरच स्पष्ट होईल. 
 
शहर बसचा प्रवास : महानगरपालिकेची स्थापना झाली आणि त्यानंतर लगेच शहागंज येथील जुने बसस्थानक गरम पाणी येथे स्थलांतरित झाले. त्याच वेळी शहर बस सेवेची सुरुवात झाली. २००५ पर्यंत एसटी महामंडळाकडून ही सेवा देण्यात येत होती. परंतु ही सेवा तोट्यात असल्याचे कारण पुढे करून ती बंद झाली. त्यानंतर लगेच पालिकेने ‘एएमटी’ नावाने खासगी तत्त्वावर ही सेवा सुरू केली. उणी-पुरी चार वर्षे ही सेवा चालली अन् बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा एसटी महामंडळाने ती आपल्याकडे घेतली. शहराच्या रस्त्यावर किमान १५० बस फिरत्या असाव्यात अशी अपेक्षा असताना फक्त ५६ बस धावताहेत. त्यामुळे ही सार्वजनिक सेवा पुरेशी नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पात चांगल्या बस येतील, असे सांगितले जाते. परंतु हा प्रकल्प किती वर्षांनी पूर्ण होणार याची नागरिकांना कल्पना नाही. त्यामुळे सेवा कोण सुरू करतो याच्यापेक्षा ती कधी सुरू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी.... 
बातम्या आणखी आहेत...