आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलमध्ये सिडको तर मेमध्ये महावीर चौकातील पूल खुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील उड्डाणपुलांचे काम कासवगतीने होत असल्याचा आरोप करत शहरवासीयांची वाहतूक कोंडीतून कधी मुक्तता करणार, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरातील तीन शहरप्रमुख अनुक्रमे राजू वैद्य, बाळासाहेब थोरात संतोष जेजूरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केला. तेव्हा एप्रिलच्या अखेरीस सिडको बसस्थानक येथील, तर मे महिन्यात बाबा पेट्रोल पंप येथील उड्डाणपूल वाहतुकीस खुला करू, असे आश्वासन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

रस्ते विकास महामंडळाच्या नियोजनानुसार एप्रिल आणि मे महिन्यात हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले व्हायला हवेत. या कामासाठी निधीचीही अडचण नाही तरीही काम संथगतीने होत असल्याचे शिवसैनिकांच्या निदर्शनास आल्याने दानवेंच्या नेतृत्वाखाली ही मंडळी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडकली. बाबा पेट्रोल पंप येथील पूल महावीर जयंतीपूर्वी वाहतुकीस खुला व्हायला हवा, अशी मागणी केली. महावीर जयंतीपर्यंत पूल वाहतुकीस खुला होईल की नाही हे सांगता येत नसले तरी या ठिकाणची पूर्व-पश्चिम अशी तूर्तास बंद असलेली वाहतूक मात्र खुली होईल, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बाबा पेट्रोल पंप येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे पूर्व-पश्चिम रस्ता अडवण्यात आला आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. शहरात नव्याने आलेल्या वाहनधारकांना रस्ता शोधावा लागतो. असाच काहीसा प्रकार सिडको बसस्थानक येथील चौकात आहे. येथील रस्ता दक्षिणोत्तर दिशेने वाहतुकीस बंद आहे. नियोजित वेळेत हा रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी यापूर्वीही अनेकांनी केली आहे. परंतु त्यावर रस्ते विकास महामंडळाकडून नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात येत आहे, असेच उत्तर देण्यात येत होते. आजही त्यांनी तसेच उत्तर दिले. कोणत्याही परिस्थितीत शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत काम पूर्ण होईल, पुलाखालील रस्ते वाहतुकीस मोकळे केले जातील, असे आश्वासन दिले.

शिवसैनिकांच्या शिष्टमंडळात पालिकेतील सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, माजी सभागृहनेते संतोष खेंडके सुशील खेडकर, छावणीचे नगरसेवक किशोर कछवाह, बाळू गडके, संतोष मरमठ, माजी नगरसेवक दिग्विजय शेरखाने यांचा समावेश होता.

वरिष्ठ अधिकारी मात्र गायब
शिवसैनिक जाब विचारण्यासाठी येणार असल्याचे समजल्यानंतर महामंडळाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक ही मंडळी गायब होती. शिवसैनिक नेमक्या कोणत्या पद्धतीने जाब विचारणार याची कल्पना नसल्याने ही मंडळी कार्यालयात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईला बैठकीसाठी हे अधिकारी गेल्याचे बर्डे यांनी शिवसैनिकांना सांगितले.

आज पुन्हा पाहणी करणार
एमआयडीसीचीजलवाहिनी स्थलांतरित केली नसल्याने येथील कामास विलंब होत असल्याचे उपअभियंता उदय बर्डे यांनी सांगितले. प्रत्यक्षात चित्र काय आहे, याची पाहणी करण्यासाठी शिवसैनिक उद्या सकाळी ११ वाजता सिडको चौकात जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. आधीच जलवाहिनी स्थलांतरित का केली नाही? अशी विचारणा शिवसैनिकांनी केली. वाहिनी स्थलांतरित करण्याचे काम आता हाती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पुलाचे काम उशिराने होत असल्याने ठेकेदाराला प्रती आठवडा २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार होता, परंतु वाहिनी स्थलांतरित झाल्यानंतर हा दंड आकारला जाणार आहे.