आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी ‘उजळणार’ दरवाजांचे नशीब?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद हे ५२ दरवाजांचे ऐतिहासिक शहर. अर्थात त्यात फार थोडे दरवाजे सध्या अस्तित्वात आहेत. जे आहेत त्यांचा पर्यटनस्थळ म्हणून उपयोग करण्याचा संकल्प मनपाने केला होता. त्या माध्यमातून शहराचा ऐतिहासिक ठेवा संस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी त्यातून उत्पन्नही वाढावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कोटींचे अंदाजपत्रकही तयार होते. पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. उलट पूर्वीपेक्षाही या दरवाजांची अवस्था बकाल झाली आहे. बहुतांश दरवाजात परिसरात अतिक्रमण झाले आहे.
हाहोता मुख्य उद्देश
शहरात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटक दिवसभर शहर आणि शहराबाहेरची पर्यटनस्थळे पाहून सायंकाळी शहरात परत येतात. त्यांना रात्रीच्या वेळी शहरात पाहता येईल, असे काही नाही. ही उणीव दूर करण्यासाठी हर्सूल टी पॉइंट ते स्मृतिवनादरम्यान एका ठिकाणी ध्वनी-प्रकाश -नृत्यांच्या माध्यमातून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना येथील संस्कृतीची ओळख करून दिली जाणार होती. तसेच शहरातील १२ प्रमुख ऐतिहासिक दरवाजे रात्रीच्या वेळीही प्रेक्षणीय दिसावेत यासाठी त्यांना रंगीबेरंगी लाइटचे इफेक्ट देण्यात येणार होते. शिवाय त्या ठिकाणी बुकलेटच्या माध्यमातून शहराचा ऐतिहासिक वारसा सर्वत्र पोहोचावा शहरात येणाऱ्या पर्यटकांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी ही योजना आखण्यात आली होती.

बुकलेटची कल्पनाही पडली मागे
पुणे मनपाच्या धर्तीवर औरंगाबादेत विविध मार्गांनी दाखल होणाऱ्या जसे विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणांहून मनपा हद्दीतील पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना बुके देण्याएेवजी शहरातील ऐतिहासिक वारसास्थळे, पर्यटनस्थळे, महापालिका याविषयीची माहिती असलेली बुकलेट द्यावी, अशी कल्पना होती. पण तीही मागेच पडली.

पर्यटन कक्षही वाऱ्यावर
यादृष्टीने महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी रेल्वेस्टेशन मार्गावर ३० जून २०१६ रोजी पर्यटन कक्ष सुरू केला आहे. त्या माध्यमातून शहरातील महमूद दरवाजा, बारापुल्ला, मकई, रोशन, नौबत, काला, पैठण गेट, खास, रंगीन गेट अन्य दरवाजे सायंकाळनंतर पर्यटकांच्या नजरेत भरावेत म्हणून त्यांना लाइटच्या इफेक्टची जोड दिली जाणार होती. दिवसभर शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी दिलेल्या पर्यटकांना सायंकाळी ऐतिहासिक दरवाजे शहराच्या इतिहास संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी हे काम केले जाणार होते. पण दिल्ली गेट वगळता एकाही दरवाजावर हे काम झाले नाही.

निधीची तरतूदही
या प्रकल्पासाठी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांची प्रकल्प प्रमुख म्हणून नेमले होते. तर पर्यटन कक्षाची जबाबदारी मनपाचे जनसंपर्क अधिकारी तौफिक खान, तसेच मधुकर वाघमारे यांच्यावर टाकण्यात आली होती. पर्यटन कक्षाच्या माध्यमातून वरील सर्व कामांसाठी २०१६ च्या अंदाजपत्रकात कोटींची तरतूद करणार असल्याचा गवगवाही करण्यात आला होता.

मौलाना आझाद शिक्षण संस्थेचा पुढाकार
यासंस्थेने दिल्ली गेटचा कायापालट केला. दगडी सुरक्षा कवच बांधले, डागडुजी केली, अंतर्गत सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे, पाण्याची साेय केली, आरजीबी (रेड, ग्रीन, ब्ल्यू) लाइट इफेक्ट दिले. सायंकाळी अजिंठ्याहून शहरात परतणाऱ्या पर्यटकांच्या मनात खऱ्या अर्थाने दिल्ली गेट मनोहारी ठरले. यासाठी संस्थेने स्वत: खर्च केला.

फक्त औटघटकेचा ठेवा
आम्ही रंगीन दरवाजावर तसाच प्रयोग केल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर चमूने रंगीन दरवाजा परिसरात पाहणी केली असता केवळ काही महिन्यांपूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान तसा प्रयोग केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. नंतर नो इफेक्ट असल्याचेही लोक म्हणाले.

‘लाइट अँड साउंड शो’ दूरच, उलट बहुतांश दरवाजांचा परिसर बकाल झाला आहे. काही मोजके दरवाजे वगळता शहरातील इतर सर्व दरवाजांची स्थिती अशी भयंकर आहे.

विद्यापीठ पर्यटन विभागाची दिशाभूल
उद््घाटनाचामुहूर्त साधण्यासाठी मनपाने विद्यापीठातील पर्यटन विभागाशी समन्वय साधला. विमानतळ, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक तसेच पर्यटन सहली आयोजित करणाऱ्या एजन्सीच्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना शहरात कोणती ठिकाणे पाहण्यायोग्य आहेत, त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था, त्या जागांचे महत्त्व याविषयी माहिती देणे, पर्यटकांशी संवाद साधणे, त्यांच्याशी वर्तणूक कशी करावी, याविषयी विद्यापीठाच्या पर्यटन विभागात एक आठवड्याचा अभ्यासक्रम सुरू करणार, प्रशिक्षित युवकांमार्फत पर्यटनस्थळांचे मार्केटिंग वाढवणार, असे सांगण्यात आले होते. उद््घाटनापुरती सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना दरमहा १२ हजार रुपये महिना देण्याचेही ठरले. पण पाच महिन्यांपासून ते कुठलेही मानधन मिळालेले नाही. पदरखर्च करून ते हे काम करत आहेत; पण आता ही मुलेही थकली. त्यामुळे पर्यटनकक्ष ओस पडलेला दिसला.

आयुक्तांचा पुढाकार
पर्यटकांसाठी लाइट अँड साउंड शो ही मनपा आयुक्तांची खूप चांगली संकल्पना आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी मार्गदर्शन केले आहे. स्मृतिवन, सिद्धार्थ उद्यान, बीबी का मकबरा आणि शिवाजी पुराणवस्तुसंग्रहालय येथे ही संकल्पना राबवणार आहोत. दोन दिवसांपूर्वी या स्थळांची पाहणी केली आहे. संंबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती जमा करणे सुरू आहे. त्यावर अाधारितच पाठीमागून साउंड ट्रॅक देणार. पोवाडा, तुतारी आणि संगीत, नृत्य आणि वेगवेगळ्या लाइट इफेक्टच्या माध्यमातून पर्यटकांना एक आगळावेगळा अनुभव देणार आहोत. दरवाजांबाबतही हालचाली सुरू आहेत. प्रदीपदेशपांडे, हेरिटेजवास्तुतज्ज्ञ
याबाबत मनपाचे पर्यटन कक्षाचे प्रमुख तौफिक खान, मधुकर वाघमारे यांच्याशी वेळाेवेळी संपर्क साधला, मात्र संपर्क हाेऊ शकला नाही.
बातम्या आणखी आहेत...