आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती सदस्य ‘टायगर्स लीप’वर, तर नाराज ‘मातोश्री’वर जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर उपमहापौर निवडणूक १४ डिसेंबर रोजी होणार अाहे. नगरसेवकांची खुशामत म्हणून त्यांना लोणावळा सहल घडवली जात आहे. नगरसेवकांची नाराजी वाढू नये यासाठी हा फंडा आहे. भाजपसह शिवसेनेचे सदस्य रविवारी रात्री उशिरा लोणावळा सहलीसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेतील काही नाराज नगरसेवक सोमवारी थेट “मातोश्री’वर जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शनिवारी नाराजांना डावलून शिवसेनेच्या वतीने उपमहापौरपदासाठी अपक्ष नगरसेवक स्मिता घोगरे यांचे नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. त्यामुळे शिवसेनेतील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांतील हेवेदावे वाढत चालले आहेत. त्यात सर्वात मोठी बाब म्हणजे सेनेतील वरिष्ठ नगरसेवकांचीच पक्षाने नाराजी ओढवून घेतली आहे.

त्यामुळे सेनेत नाराजांची संख्या वाढत आहे. ही संख्या अजून वाढू नये यासाठीच ही सहल आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी सात वाजेपासून सर्व नगरसेवक महापौर बंगल्यावर जमत होते. शेवटी नऊ वाजता वाहनांचा ताफा लोणावळ्याकडे रवाना झाला. यात महापौरपदाचे दावेदार असलेले भगवान घडामोडे मात्र शहरातच तळ ठोकून आहेत.

व्हीआयपी सुविधा उपलब्ध : सहलीवरजाण्यासाठी पाच इनोव्हा, दोन लक्झरी बसने युतीचे नगरसेवक रवाना झाले आहेत. लोणावळ्याला तीन हजार रुपये प्रतिदिवस रूम भाडे असलेल्या व्हीआयपी रूम्स आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरा युतीची सहल शहरात दाखल होणार असून तोपर्यंत ही मंडळी लोणावळा येथील टायगर लीप, भुशी डॅम इतर व्ह्यू पॉइंटवर पर्यटन करतील, असे सूत्रांनी सांगितले.

सहलीत दिग्गजांचा अभाव, पैठण निवडणुकीचा भार
सहलीत एकनिष्ठ नगरसेवक सहभागी झाले आहेत. दुसरीकडे सेनेचे राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, नंदू घोडेले, विकास जैन, ऋषी खैरे, सचिन खैरे, प्रमोद राठोड आणि दिलीप थोरात यांच्यावर पैठणच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांनी सहलीवर जाण्याचे टाळले.

आतापासूनच घडामोडेंनी घेतला महापौर बंगल्याचा ताबा
महापौरपदाची निवड १४ तारखेला होणार आहे. त्यानंतर नव्या महापौरांना बंगला मिळणार आहे. असे असले तरी शनिवारपासूनच घडामोडे यांनी महापौर बंगल्याचा ताबा मिळवला आहे. सहलीचे नियोजन येथेच झाले असून येथूनच सहलीसाठी वाहनांचा ताफा रवाना झाला आहे.

सेनेचे नगरसेवक ‘मातोश्री’वर धडकणार
रविवारी युतीची सहल निघाली असून सोमवारी सेनेचे नाराज नगरसेवक “मातोश्री’वर जाणार आहेत. इतरांनी नामनिर्देशन पत्रे भरली नसली तरी नाराजी व्यक्त करून स्थानिक पातळीवर नेत्यांकडून कशी वागणूक दिली जात आहे, याची माहिती देण्यासाठी नाराज नगरसेवक “मातोश्री’वर जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...