आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना-भाजपचे आजी-माजी आमदार मनपात सक्रिय होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहरात आमदारांची संख्या कमी नसली तरी शहराच्या विकासाचा गाडा हाकणाऱ्या महानगरपालिकेकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. पालिकेत कायम सक्रिय असलेले माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही पालिकेकडे दुर्लक्ष केल्याचे अलीकडे दिसून येते. मात्र, यापुढील काळात दोन पक्षांचे आजी आणि माजी आमदार पूर्ण क्षमतेने पालिकेच्या कारभारात लक्ष घालणार आहेत. शिवसेनेकडून पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, तर भाजपकडून माजी आमदार तथा शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी हे दोघे आता सक्रिय होतील.
शिरसाट यांनी पालिकेच्या कारभारात लक्ष द्यावे, अशा सूचना पक्षाच्या वतीने त्यांना देण्यात आल्या आहेत. तसे त्यांनी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे सांगितले. दुसरीकडे आता महापौरपद भाजपकडे जाणार असल्याने शहराध्यक्ष तनवाणी यांनीही पालिकेत विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्र्यंबक तुपे हे १९ महिने महापौर होते. पालकमंत्री रामदास कदम यांच्या थेट संपर्कात असल्याने शिवसेनेच्या अन्य कोणी पालिकेच्या कारभाराकडे लक्ष दिले नाही. मात्र, आता पुढील काळात हे चित्र बदलणार आहे.

का होणार सक्रिय? : अलीकडच्याकाळात आयुक्तपदी असलेले अधिकारी नगरसेवकांना जुमानत नाहीत, अशा नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. प्रकाश महाजन यांच्याशी वाद झाल्याने त्यांच्याविरोधात सभेने अविश्वास प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून आलेले सुनील केंद्रेकर यांनीही नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना जुमानले नाही. आताचे ओमप्रकाश बकोरिया हेदेखील नगरसेवकांना तर सोडाच थेट महापौरांचेही ऐकत नाहीत. ‘मी तुमचे काम करणार नाहीच’ अशी भाषा बकोरिया यांच्याकडून वापरली जात असल्याच्या तक्रारी शिवसेना तसेच भाजपच्या नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांकडे केल्या.

पालिकेचा कामकाजाचा अनुभव असलेल्या नेत्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. आता महापौरपद भाजपकडे आहे. भाजप हा पक्ष म्हणून धडाक्यात विकास करू शकतो, हे पक्षाला दाखवून द्यायचे आहे. परंतु अधिकारीच ऐकणार नसेल तर त्यांना जे करून दाखवायचे आहे ते शक्य होणार नाही. त्यामुळेच तनवाणी यांनी लक्ष घालण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे महापौरपद भाजपकडे असताना शिवसेनेच्या नगरसेवकांची कामेही तेवढ्याच गतीने व्हायला हवीत, त्यामुळे सेनेने शिरसाट यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चा : पदाधिकाऱ्यांनादेण्यात येणाऱ्या वागणुकीत आयुक्त बकोरिया यांनी सुधारणा करावी, अशी पहिली अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली जाणार आहे. त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल, असे संकेत आहेत.

दोघांनाही पालिकेचा अनुभव
तनवाणी आणि शिरसाट या दोघांनाही महानगरपालिकेच्या कामकाजाचा तगडा अनुभव आहे. तनवाणी यांनी महापौर म्हणून काम केले आहे, तर दोन वेळा नगरसेवक राहिलेले शिरसाट यांना सभागृहनेता म्हणूनही कामाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे दोघांनाही पालिकेतील कामकाजाच्या बारीकसारीक बाबींचा अभ्यास आहे. त्यामुळे ही जुनी जोडी जर पालिकेत सक्रिय झाली तर त्याचा फायदा शहराच्या विकासासाठीच होईल, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...