आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकोरियांची बदली होताच महानगरपालिकेत पुन्हा ‘पतिराज’; वाॅर्ड कार्यालयात येऊन करतात दादागिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पालिका सभागृहात ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला सदस्या आहेत. पत्नी नगरसेविका असली तरी वाॅर्ड तसेच पालिकेतील कारभार हा पतिराजांकडून बघितला जातो. नगरसेविका पत्नी घरी अन् पती थेट आयुक्तांना दमदाटी करण्यासाठी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नगरसेविका पतींना पालिका मुख्यालयात येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे बकोरिया असेपर्यंत ही मंडळी चोरून-लपून पालिकेत येत असत. मात्र, शनिवारी त्यांची बदली झाली अन् सोमवारपासून पालिकेत ‘पतिराज’ पुन्हा सुरू झाल्याचे चित्र दिसले. विविध समित्या तसेच वाॅर्ड सभापती असलेल्या नगरसेविकांच्या पतिराजांनी तर खुर्चीचाही ताबा घेतल्याची चर्चा आहे. 

महिलांना समान संधी असावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षण देण्यात आले. ११५ सदस्यांच्या सभागृहात त्या न्यायाने ५८ महिला असणार हे स्पष्ट होते. प्रत्यक्षात महिला सदस्यांची संख्या ही ६० पर्यंत पोहोचली. पुरुषांसाठी खुल्या असलेल्या वाॅर्डातूनही दोन महिला विजयी झाल्या. त्यामुळे सभागृहात आजघडीला महिला सदस्यांची संख्या ही पुरुषांपेक्षाही जास्त आहे. मात्र, तरीही सर्वसाधारण सभेचा दिवस सोडला तर पालिका मुख्यालयात पूर्वी महिला नगरसेविका येत नसत. कारण त्यांचे पतीच वाॅर्डातील कामाच्या संचिका घेऊन अधिकाऱ्यांकडे जात. यातून काही अधिकाऱ्यांशी वाद झाल्याने बकोरिया यांनी नगरसेविका पतींना कार्यालयात येण्यास बंदीचा फतवा जारी केला होता. एखाद्या नगरसेविका पतीने जर अधिकाऱ्याशी किरकोळही वाद घातला किंवा त्याच्या हाती पालिकेची संचिका दिसली तर थेट गुन्हा नोंदवला जाईल, असे स्पष्ट केले होते.
 
नवीन आयुक्तांनी लक्ष द्यावे 
बकोरियायांच्या आदेशामुळे नगरसेविका पती पालिका मुख्यालयात फिरकताना दिसत नव्हते. तरीही ही मंडळी वाॅर्ड कार्यालयात मात्र दिसतच होती. अर्थात त्यांचा त्रास मात्र कमी झाला होता. मात्र, बकोरिया यांनी आयुक्त म्हणून पालिका सोडली अन् लगेच पहिले पाढे पंचावन्न झाल्याचे दिसून आले. सातारा वाॅर्डातील सभापतींच्या खुर्चीचा ताबा तर थेट त्यांच्या पतीनेच घेतल्याचे समोर आले. त्यामुळे बकोरिया यांच्या प्रमाणेच नवीन आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता अधिकारी करू लागले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...