आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गतिमान’ प्रशासन : 5 महिने फक्त चर्चाच, ‘विघ्नहर्ता’ गेल्यानंतरच मनपाचे अंदाजपत्रक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या भाजपची सत्ता असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेचे अंदाजपत्रक विद्यमान आर्थिक वर्षातील पाच महिने संपले तरी तयार झालेले नाही. गेले पाच महिने फक्त चर्चा करण्यात नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यातच गेल्याने अंदाजपत्रक अंतिम होऊ शकले नाही.
 
विघ्नहर्त्याला निरोप दिल्यानंतर म्हणजेच सप्टेंबरनंतर एकदाचे अंदाजपत्रक नगरसेवकांच्या हाती पडणार आहे. शनिवारी महापौर भगवान घडमोडे यांनी अंदाजपत्रकावर शेवटचा हात फिरवून कोणाची कामे घ्यायची नि कोणाचे वगळायचे हे अंतिम केले. त्यानंतर सोमवारी अंदाजपत्रक छपाईसाठी जाईल. दरवर्षी साधारणपणे एप्रिल महिन्यात अंदाजपत्रक तयार होऊन नगरसेवकांच्या हाती पडते. फार तर कधी कधी मे महिना उजाडतो. यंदा मात्र सप्टेंबर महिना उजाडला आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. शनिवारी दुपारी घडमोडे यांनी ‘रायगड’ बंगल्यावर अंदाजपत्रकावर शेवटचा हात फिरवला. काही कामे वगळण्याची तसेच काही कामांचा समावेश करण्याच्या अंतिम सूचना देऊन दोन दिवसांत अंदाजपत्रक छपाईसाठी पाठवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. 
 
१२७८ कोटींचे अंदाजपत्रक 
अंदाजपत्रक छपाईसाठी गेल्यानंतर दोन दिवसांत त्याच्या प्रती उपलब्ध होतील. प्रशासनाने ९०० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यात स्थायी समितीने १०० कोटी रुपयांची वाढ केली होती. महापौरांकडून येणारे अंदाजपत्रक हे १२७८ कोटी रुपयांचे असणार आहे. यातील किमान २०० कोटी रुपयांपर्यंतची कामे या वर्षात होण्याची शक्यता आहे. 
 
‘अनुभवी’ घडमोडे मर्जी सांभाळण्यात गुंतल्याने विलंब 
महापौर घडमोडे हे मनपात अनुभवी आहेत. ते चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे ते एका फटक्यात अंदाजपत्रक बाजूला करतील, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु आपला कार्यकाळ इनमिन ११ महिन्यांचा. त्यात अनेकांना कशाला नाराज करायचे, असे घडमोडे यांना वाटले आणि त्यांनी विलंबाने आलेल्या नगरसेवकांच्या शिफारशींना अंदाजपत्रकात स्थान देण्याचा सपाटा लावला. 
 
5 सप्टेंबरनंतरच अंदाजपत्रक पडणार नगरसेवकांच्या हाती 
विलंबाचा तोटा : यंदाची कामे पुढच्या अंदाजपत्रकात ‘स्पील ओव्हर’ म्हणून घ्यावी लागणार : 
एप्रिल किंवा मे महिन्यात अंदाजपत्रक हाती पडल्यानंतर नगरसेवक कामाला लागतात. अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत ते विविध कामांचे अंदाजपत्रक तयार करून घेतात. त्यानंतर निविदा प्रक्रिया होते आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामे सुरू होतात. थोडक्यात अंदाजपत्रक हाती पडल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजेच आता नगरसेवकांच्या हाती अंदाजपत्रक पडल्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर त्यांचे कामे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुरू होईल. म्हणजेच आर्थिक वर्ष संपत असताना पहिल्या टप्प्यातील कामे सुरू झालेली असतील. दुसऱ्या टप्प्यातील कामांचा पाठपुरावा सुरू होण्यापूर्वीच वर्ष संपलेले असेल. म्हणजेच या वर्षातील बहुतांश कामे ही पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात स्पील ओव्हरची कामे म्हणून घ्यावी लागतील. 
बातम्या आणखी आहेत...