आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद मनपाच्या 1200 भूखंडांपैकी 600 शोधले, 300 पेक्षाही जास्त भूखंडांवर अतिक्रमण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : शहरभरात मनपाच्या मालकीचे बाराशे भूखंड खुल्या जागा आहेत. त्यातील ६०० जागा मनपाच्या विशेष सहा पथकांनी शोधल्या असून त्यातील तब्बल ३०० पेक्षा जास्त जागांवर विविध लोकांनी अतिक्रमण केल्याचे डीबी स्टारच्या तपासातून उघड झाले आहे. एकीकडे पालिकेची तिजोरी रिकामी असल्याचे वारंवार सांगितले जाते. दुसरीकडे अब्जावधीच्या मालमत्तांवर असे अतिक्रमण झाले आहे. डीबी स्टारने वारंवार हा विषय लावून धरला त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरच या जागा शोधण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. 
 
शहराच्या विविध भागांतील महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवरील अतिक्रमणाबाबत डीबी स्टारने सातत्याने आवाज उठवला. नगररचना विभागापासून आयुक्तांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. अनेक कोट्यवधींच्या भूखंडांवरील अतिक्रमणाची प्रकरणे वृत्त प्रसिद्ध करून उघडकीस आणली. पालिकेच्या मालकीच्या या जागांवरील अतिक्रमणेही हटवली गेली पाहिजेत यासाठी चमूने शहानूरवाडी, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, गारखेडा, टिळकनगर, उस्मानपुरा, भाग्यनगर, ज्योतीनगर, बीड बायपास, सातारा, देवळाई, पडेगाव, मिटमिटा, पुष्पनगरी, सिल्लेखाना तसेच खोकडपुरा आदी परिसरातील बहुतांश भूखंडमाफियांचा पर्दाफाश केला होता. 
 
माहिती अधिकारात दिली बाराशे भूखंड असल्याची माहिती 
एकीकडे आपल्याच विभागाला यादी नसल्याचे कळवणाऱ्या मालमत्ता अधिकाऱ्याने शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश वर्मा यांना माहिती अधिकारात मनपाच्या मालमत्तांचा तपशील, वॉर्ड कार्यालय, नगर भूमापन क्रमांक, मोहल्ला आणि क्षेत्रफळासह सिडको - हडको, सातारा - देवळाईसह नव्याने महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील भूखंडासह बाराशे भूखंड असल्याची माहिती दिली. 
 
सहा पथकांनी केले काम 
त्यानुसार उपायुक्त निकम यांनी प्रशासकीय अधिकारी, मालमत्ता अधिकारी नगररचना विभागाचे अधिकारी यांची सांगड घालून सहा पथके तयार केली होती. वॉर्ड कार्यालयनिहाय या पथकांना पालिकेच्या जागांचे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले. सुमारे महिनाभर सर्वेक्षणाचे काम चालले. सहा महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण झाले तेव्हा पालिकेच्या मालकीच्या किमान सहाशे जागा या पथकांच्या हाती लागल्या. सहाशे जागांपैकी तीनशेपेक्षा जास्त जागा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या असल्याचे डीबी स्टारच्या तपासातून उघड झाले. 

उत्पन्न दूर, उलट खर्च होतो 
बहुतांश पालिकेला या जागांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे त्या पालिकेला वापरता येत नाहीत. शिवाय त्यावर अतिक्रमणामुळे त्यापासून उत्पन्नही मिळत नाही. उलट अतिक्रमणांमुळे विकासालाही खीळ बसते. अतिक्रमितांच्या दबावाला बळी पडून लोकप्रतिनिधी मनपा प्रशासनाला या अतिक्रमितांना सुविधा देण्यास भाग पाडतात. त्यामुळे आपल्या मालमत्तांपासून उत्पन्न मिळण्याऐवजी त्यावर सुविधा देण्यासाठी विनाकारण खर्च मनपाला करावा लागतो. त्यामुळेच डीबी स्टारने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून या अतिक्रमणावर निर्णय घेणे प्रशासनाला भाग पाडले. 
 
विभागाकडे यादीच नाही 
पालिकेच्या मालकीच्या जागांचा त्यावरील अतिक्रमणांचा शोध लावण्यासाठी पथकप्रमुखांनी मालमत्ता विभागाला शहरातील मनपाच्या मालकीच्या खुल्या जागांची यादी मागितली होती. मात्र, या विभागाकडून तशी अद्ययावत यादी नसल्याचे कळवल्याने पथकाला महिनाभर मोठी भटकंती करावी लागली होती. त्यामुळे त्या-त्या भागातील लोकांशी चर्चा करून, नगरसेवकांशी बोलून पथकातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना जागा शोधून काढाव्या लागल्या. मात्र, मालमत्ता विभागाकडे यादीच नसल्याने अजून अशा किती जागा आहेत हे स्पष्ट झालेले नाही. 
 
पुढील स्लाइडवर वााचा, काय म्हणतात मनपा आयुक्त आणि बकोरियांनी घेतली होती दखल...
बातम्या आणखी आहेत...