आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा विक्रम: सहा वेळा सभा तहकूब, नागरिकांच्या प्रश्नावर केवळ 45 मिनिटे चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या तीन-चार दिवसांत पावसाने हाहाकार उडवला. सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून अमलात आणलेली भूमिगत गटार योजना फसल्याने जयभवानीनगर, नूर काॅलनीसह अनेक भागांतील चार हजारांपेक्षा अधिक घरांत पाणी शिरले. पुढे असा प्रकार होऊ नये, यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत. योजना नेमकी का फसली. त्यास जबाबदार कोण आहे, याचा जाब नगरसेवक सोमवारी (१८ सप्टेंबर) सर्वसाधारण सभेत प्रशासनाला विचारून धारेवर धरतील आणि महापौर भगवान घडमोडे ठोस कारवाईचा आराखडा जाहीर करतील, अशी १५ लाख औरंगाबादकरांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ३२० मिनिटांच्या सभेत १०५ मिनिटे तहकुबीत गेली. २१५ मिनिटे कामकाज चालले. त्यातील फक्त ४५ मिनिटे लोकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यातही ठोस उपाययोजना जाहीर झाल्या नाहीच. 

‘वंदे मातरम’ म्हणण्याचे कारण पुढे करून १९ ऑगस्टला तीन वेळा तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. तीदेखील तीनदा तहकूब करण्यात आली. एकूण सहा वेळा सभा तहकूब होण्याचा विक्रम नोंदवला गेला. नाल्यांचे पाणी घरात शिरल्याच्या मुद्द्यावर सोमवारच्या सभेत गंभीर चर्चा अपेक्षित होती. मात्र, निलंबित अधिकाऱ्यांना कामावर घेण्याचा निषेध करण्यासाठी खोट्या नोटा उधळण्याचा इरादा शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी जाहीर केला. तो उधळून लावणे अधिक महत्त्वाचे मानत महापौर भगवान घडमोडे यांनी सभा तहकुबीचा विक्रम नोंदवला. जंजाळ यांचे सदस्यत्व दिवसभरासाठी निलंबित केले. 

पाणी शिरण्याच्या मुद्द्याला फक्त ४५ मिनिटे
गेल्याआठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भगतसिंगनगर, मयूरपार्क, मारुतीनगर, जयभवानीनगर, नूर कॉलनीसह शहरातील बहुतांश वसाहतींत घरांत पाणी शिरले. सभेत यावरच चर्चा अपेक्षित होती. सुरुवात तशी झालीही. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी या मुद्याला हात घातला. एमआयएमचे गंगाधर ढगे, सय्यद मतीन, समीना शेख, अय्युब जहागीरदार, सेनेचे नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, बन्सी जाधव, सचिन खैरे यांनी लोकांचे गाऱ्हाणे मांडले. मात्र, एकानेही भूमिगत योजनेतील त्रुटी उघड केल्या नाहीत. त्यावर प्रशासनाला जाब विचारला नाही. त्यामुळे ‘सात दिवसांत जयभवानीनगर आणि नूर कॉलनी येथील नाल्यांवरील बांधकामे काढली जातील, त्यानंतर शहरातील अन्य नाल्यांकडे मोर्चा वळवला जाईल’ असे सांगत अधिकारीही मोकळे झाले. 

११.५५ ते १२.४० घरात पाणी शिरल्याच्या मुद्द्यावर चर्चा. 
१२.५५ : सभा तहकूब. 
१.२० : सभा सुरू 
१.२५ : तहकूब. 
१.४० : सभा सुरू 
२.५० : जंजाळ निलंबित 
सभा तहकूब. 
४.०० : सभा सुरू ५.१५ : समाप्त
 
सभा वेळा तहकूब होण्याचा विक्रम 
मनपा इतिहासात सहा वेळा सभा तहकूब झाल्याचे आठवत नसल्याचे निवृत्त नगर सचिव एम. ए. पठाण म्हणाले. १९ ऑगस्ट आणि १८ सप्टेंबरला प्रत्येकी तीन वेळा सभा तहकूब झाली. मधल्या काळात दोन वेळा ती पुढे ढकलण्यात आली होती. 

गंभीर मुद्द्याचेही राजकारण 
पावसाचेपाणी घरांत शिरणार नाही, यासाठी नगरसेवक काय करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. परंतु, जेव्हा नूर कॉलनीतील नाला रुंदीकरणाविषयी गंगाधर ढगे, सय्यद मतीन यांच्याकडून प्रश्न होत असताना प्रमोद राठोड यांनी आधी जयभवानीनगरच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, असे म्हटले. दोघांनीही आपापले मुद्दे लावून धरले. कोणीही मागे हटायला राजी नव्हते. तेव्हा आधी कशावर चर्चा हे तुम्ही ठरवा, तोपर्यंत सभा तहकूब असे सांगत महापौरांनी सभा थांबवली आणि त्यानंतर हा मुद्दाच आला नाही. 
बातम्या आणखी आहेत...