आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बदला घ्याल याची कल्पना असूनही प्रश्न विचारतो साहेब’; भरसभेत राजू शिंदेंचा पवित्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘मला माहिती आहे, मी प्रश्न विचारले म्हणून उद्या तुम्ही अधिकारी, कर्मचाऱ्यांना माझ्या वॉर्डात पाठवाल. जबरदस्तीने करवसुली सुरू कराल. काही घरे अतिक्रमित सांगून पाडाल. तरीही आयुक्तसाहेब, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या,’ हे वक्तव्य आहे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचे. आयुक्तांना एखाद्या नगरसेवकाने जाब विचारला की दुसऱ्याच दिवशी बदला चुकवणे सुरू होते, असा अनुभव अनेक नगरसेवकांना यापूर्वी आला आहे. तरीही शिंदे यांनी सभेत वक्तव्य केले. यामुळे महापालिकेत आयुक्त ओमप्रकाश बकोरियांचे ‘बदला पर्व’ सुरू असल्याचे समोर आले. 
 
 
मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाविषयी सोमवारी आयोजित विशेष सभेत हा प्रकार घडला. शिंदे यांनी करवसुलीवरून बकोरियांना घेरले. वसुलीसाठी काय नियोजन केले, असे वारंवार विचारले आणि काहीच नियोजन केले नसल्याचे दाखलेही दिले. शिंदेंसह राजू वैद्य, प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे यांनी आयुक्तांची कोंडी केली होती. आमच्याविरोधात आयुक्त जे काही करतील, त्याला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
 
मी यादी दिली...तुम्ही काय केले? 
शिंदे म्हणाले की, मी वीज वितरण कंपनीकडील मालमत्ताधारकांची, शॉप अॅक्ट प्रमाणपत्रधारकांची यादी दिली होती. परंतु त्यावर आयुक्तांनी काय केले, आमचे काम नसतानाही आम्ही प्रशासनाला मदत करतोय. परंतु प्रशासन काहीच करत नाही, अशी टीका करतानाच बकोरिया सक्षम आयुक्त असले तरी शून्य नियोजन अधिकारी असल्याचा आरोप त्यांनी केला. याला आयुक्तांनी आक्षेप घेतला, ‘याला माझा विरोध आहे, असे शब्द वापरू नये’ असे ते म्हणाले. तर मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे.
 
 नियोजन केले नसेल तर मी शून्य नियोजन अधिकारीच म्हणणार, असे शिंदे यांनी सांगितले. तेव्हा बकोरिया सभागृह सोडण्यासाठी उभे राहिले अधिकाऱ्यांनीही बाहेर पडावे, असा त्यांनी इशारा केला. नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल या ज्येष्ठ नगरसेवकांनी आयुक्तांना रोखले. ‘मी पीठासीन अधिकारी आहे, माझ्या परवानगीशिवाय आयुक्त, अधिकाऱ्यांनी जाऊ नये’ असे महापौर भगवान घडामोडेंनी सुनावल्यावर बकोरियांनी माघार घेतली. 
 
पुन्हा शून्य नियोजन : त्यानंतरकामकाज सुरू झाले. तेव्हा दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार नाही. महावितरण पथदिव्यांची वीज कापते, अख्खे शहर अंधारात राहते, पालिकेचे दूरध्वनी कापले जातात. पाणीपट्टीची वसुलीच होत नाही. तेव्हा आयुक्तांनी केलेले नियोजन कोठे आहे, किती बैठका घेतल्या, कोणाची मदत घेतली, असा सवाल वैद्य यांनी केला आणि तुम्ही शून्य नियोजन अधिकारी नाहीत का, ते सांगा, असाही प्रश्न केला. महापौर घडामोडे यांनीही पालिकेच्या दिवाळखोरीचा मुद्दा उपस्थित करून अप्रत्यक्षपणे बकोरियांवर शून्य नियोजनचा ठपका ठेवला. 
 
११५ पैकी एकाही नगरसेवकाला नोटीस नाही 
करवसुलीसाठी नोटिसा पाठवल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यावर वैद्य, शिंदे यांच्याशी विचारणा केल्यावर महापौर, उपमहापौर स्मिता घोगरे तसेच एकाही नगरसेवकाला तसेच सभागृहाच्या गॅलरीत बसलेल्या पत्रकारांना नोटिसा मिळाल्या नसल्याचे स्पष्ट झाले. 
 
बंदोबस्त नको, फक्त नोटिसा द्या 
वसुलीसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आल्याचे बकोरियांनी सांगताच वैद्य यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘नागरिक चोर किंवा गुंड नाहीत. वसुलीसाठी पोलिसांची गरज नाही. तुम्ही फक्त त्यांना नोटिसा द्या.’ सर्वच नगरसेवकांनी वैद्य यांना पाठिंबा दिला. 
 
बकोरिया व्हॉट्सअॅपमध्ये व्यग्र 
चर्चे दरम्यान, सदस्य कर वसुलीसाठी सूचना करत असताना प्रारंभी बकोरिया मोबाइलवर व्हॅाट्सअॅप बघण्यात व्यग्र होते. नंतर नगरसेवकांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केल्यावर त्यांना मोबाइलकडे पाहण्यासही वेळ मिळाला नाही. राजू शिंदे यांनी अायुक्तांना करवसुलीवर प्रश्न उपस्थित करत उत्तर मागितले. सुरुवातीला नाही म्हणणाऱ्या आयुक्तांनी कोंडी हाेताच जागेवर उभे राहून उत्तर दिले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा- उत्तर टाळण्यासाठी आयुक्तांनी उघडले कायद्याचे पुस्तक, त्याच कायद्याने उत्तर देण्यास भाग पाडले...
बातम्या आणखी आहेत...