आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर चीनला गेल्याची संधी साधून सभेची तयारी; सभा बोलावणे अशक्य, तरी तज्ज्ञांशी चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना, भाजप यांच्यातील वाद शमता शमत नाही. शुक्रवारी सभात्याग करणाऱ्या शिवसेनेने आता महापौर भगवान घडमोडे यांच्या अनुपस्थितीत विशेष सभा घेण्याची चाचपणी सोमवारी केली. स्थायी समितीच्या चार सदस्यांनी मागणी केल्यास तीन दिवसांत विशेष सभा बोलावता येते. अर्थात त्यासाठी कारण असावे लागते. महापौरांच्या अनुपस्थितीत उपमहापौर अशी सभा घेऊ शकतात. परंतु येथे कायदा त्यांच्या बाजूने नाही. तरीही काही करता येते का, यावर विचार सुरू आहे.
 
उपमहापौर स्मिता घोगरे यांनी सोमवारी (१० जुलै) नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांना दालनात पाचारण करून कायदा काय म्हणतो हे जाणून घेतले. सेनेचे अन्य नगरसेवकही याचा अंदाज घेत होते. आता सभा बोलावता येणे काहीसे अशक्य असल्याचे सांगितले असले तरी आणखी काही तज्ज्ञांशी चर्चा करून यातून काय करता येईल, यावर सल्ला घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले. विशेष सभा बोलावून त्यात शहरातील प्रस्तावीत रस्त्यांच्या यादीवर चर्चा करण्याबरोबरच यादी नक्की करण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. तसे झाल्यास शिवसेना भाजपमधील वाद आणखी वाढतील, असे सूत्रांनी सांगितले. कारण सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊन यादी तयार केली तर शासनाकडूनही ती अंतिम ठरवली जाईल.
 
राजकारण नको
दरम्यान,शिवसेनेने रस्त्यांच्या कामात राजकारण करू नये, असा सल्ला स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी दिला. ते म्हणाले, शुक्रवारच्या सभेतून सेना सदस्यांनी निघून जायला नको होते. तरीही ते गेले आहे. विशेष सभा बोलावण्याच्या हालचाली करताहेत. त्यांनी तसे करू नये, रस्त्यांची यादी तयार करताना सेनेला विश्वासात नक्कीच घेतले जाईल, असा दावाही त्यांनी केला.
 
महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची तील कलम (क) मध्ये महापौरांच्या अनुपस्थितीत घ्यावयाच्या सभेबाबत स्पष्ट केले आहे. एक तर महापौरांचे पद रिक्त हवे, दुसरे महापौर सभा घेण्यास सक्षम नसल्याचे कारण हवे किंवा आपत्तीजनक परिस्थिती हवी. अशा वेळी उपमहापौर आणि उपमहापौर नसेल तर स्थायी समितीचे सभापती सभा घेऊ शकतात. त्यामुळे आज घडीला स्थायी समितीच्या चार सदस्यांनी मागणी केली, तर सभा बोलावता येणार नाही. कारण तशी कोणतेही आपत्कालीन परिस्थिती नाही.
बातम्या आणखी आहेत...