आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घड’माेड: शेवटच्या सभेतही महापौरांनी केले ऐनवेळचे प्रस्ताव मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धोरणात्मक निर्णयाचे अशासकीय प्रस्ताव ऐनवेळी मंजूर झाल्याचे दाखवून महापौर भगवान घडमोडे यांनी खळबळ उडवून दिली. त्यांचे ‘ऐनवेळच्या’ प्रस्तावांवर चर्चा शहरभर सुरू असताना आपल्या कारकीर्दीतील समारोपाच्या सभेतही घडमोेडेंना राहावले नाही. येथेही त्यांनी ऐनवेळचे काही प्रस्ताव मंजूर केल्याचे समोर आले आहे.
 
विशेष म्हणजे, त्यातील एक प्रस्ताव शासकीय म्हणजेच प्रशासनाकडून आलेला आहे. शेवटच्या सभेत घडमोडेंनी नेमक्या किती प्रस्तावाची ‘शाळा’ केली हे लवकरच समोर येईल. त्यांच्याशी संपर्क साधला असता, किती प्रस्ताव मंजूर झाले ते तुम्ही इतिवृत्तात बघा, असे सांगत ऐनवेळी आणखी काही प्रस्ताव मंजूर झाल्याच्या शक्यतेला त्यांनीच दुजोरा दिला. 
 
एका वरिष्ठ अधिकाऱ्याला २०१२ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. शासनाकडून ही बडतर्फी रद्द ठरवण्यात आल्यानंतर त्यांना जानेवारी २०१६ मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना विभागीय चौकशी प्रक्रियेतून दोषमुक्त करण्यात येत असल्याबद्दलचा हा प्रस्ताव आहे. तो शासकीय प्रस्ताव आहे आणि तो आयुक्तांनी विधिवत विषय पत्रिकेवर ठेवायला हवा होता. तसे झाले असते तर सदस्यांकडून यास विरोध होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे घडमोडे यांनी तो ऐनवेळी घेतला. यापूर्वी घडमोडे यांनी जे प्रस्ताव ऐनवेळी मंजूर केले, त्याच्या प्रती कोणालाही उपलब्ध होणार नाहीत, याची खबरदारी घेतली. एन-९ मधील शाळेची जागा कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव परस्पर मंजूर झाल्याचे दाखवले. 

कोणालाही याची माहिती नसताना अधिकाऱ्यांकडून जागेचा ताबा त्या शाळेला देण्याची प्रक्रियाही सुरू केली. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर ती प्रक्रिया थांबली होती. यात मोठी बदनामी झाल्याने यापुढे ऐनवेळचे प्रस्ताव घडमोडे घेणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते. परंतु त्यांनी प्रशासकीय प्रस्ताव ऐनवेळी घेतला अन् मंजूरही केला. त्याचबरोबर ऐनवेळी आणखी विषय मंजूर झाल्याचे दाखवण्याची तयारी त्यांनी दोन दिवसांपूर्वीच केल्याचे समजते. इतिवृत्तात तुम्हाला काय ते कळेलच, हे घडमोडे यांचे वक्तव्य तसेच सांगून जाते. 
 
पक्षाला पुन्हा खोटे बोलले 
यापुढेमी ऐनवेळचा एकही विषय घेणार नाही, असे घडमोडे यांनी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. परंतु त्यानंतरही ते बधले नाहीत. ऐनवेळचा प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करून त्यांनी ते स्वत:चेच करणार हे दाखवून दिले. ऐनवेळी मंजूर केलेला प्रस्ताव हा १३२९ क्रमांकाचा आहे. इतिवृत्तात यापुढील प्रस्तावाचे किती क्रमांक लागतात, यावर सर्वजण लक्ष ठेवून आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...