आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरपदाचे राजकारण: घोडेलेंच्या उमेदवारीने भाजप अस्वस्थ, अपक्षांची धाकधूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने नंदकुमार घोडेले यांच्या उमेदवारीची घोषणा केली अन् भाजपमधील इच्छुकांची अस्वस्थता वाढली. महापौरपद सेनेकडे असल्याने त्यांचा उमेदवार त्यांनी दिला. युती होऊ शकली नाही तर ती भाजपनेच फोडल्याचे खापर सेनेला फोडता येईल.
 
युती झालीच तर अपक्षांचे महत्त्व कमी होईल. त्यामुळे शुक्रवारी अपक्ष भाजपकडे विचारणा करत होते. तुम्ही उमेदवार देणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा दावा ते करत होते. मात्र भाजपने मौन बाळगणेच पसंत केले. दिवाळीनंतर कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय होईल, असे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले. 
 
पालिकेच्या इतिहास कधीच सेनेने आपला उमेदवार इतका लवकर जाहीर केलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच उमेदवार कोण हे सांगितले जात असे. अलीकडे निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवार ठरायचा. नगरसेवकांना सहलीवर न्यायचे असल्याने तसे करण्यात येत होते. परंतु २८ किंवा २९ ऑक्टोबरला ही निवडणूक होऊ शकते. त्यासाठी अजून २४ दिवस शिल्लक असताना ऑक्टोबरला पक्षाने उमेदवाराची घोषणा केली. 
 
महापौरपदापासून रोखण्याची ही रणनीती : घोडेलेंची उमेदवारी जाहीर करण्याचे सर्वात महत्त्वाचे प्रमुख कारण म्हणजे स्वबळावर महापौरपद मिळवण्याची भाजपची भाषा अन भाजप इच्छुकांकडून तसे सुरू असलेले प्रयत्न. 
 
ऐनवेळी भाजपने घात केलाच तर बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी घोडेले यांना वेळ मिळावा, हेही त्यामागील गणित आहे. घोडेले भाजपचे सहयोगी झालेले स्थायीचे सभापती गजानन बारवाल यांचे कौटुंबिक नातेसंबंध सर्वज्ञात आहेत. 
 
घोडेले उमेदवार असताना भाजपनेही उमेदवार दिला तर बारवाल हे घोडेलेंसाठीच हात वर करतील हेही पक्के आहे. त्यांच्या शहर विकास आघाडीतील काही सदस्यही घोडेले यांच्याकडेच येतील, त्यामुळे अर्थातच भाजपच्या उमेदवाराला बहुमताचा आकडा गाठणे कठीण जाईल, अशीही एक अटकळ आहे. 

म्हणजेच भाजपला स्वबळापासून आणि जर ते लढलेच तर महापौरपदापासून रोखण्याची ही रणनीती आहे. घोडेले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सेनेची खेळी काहीशी यशस्वी झाल्याचे दिसते. कारण भाजप इच्छुकांतील काहींनी तलवारी म्यान केल्याचे दिसते. 
 
अपक्षांची फोनाफोनी 
घोडेलेंच्या उमेदवारीचे वृत्त प्रसिद्ध झाल्याबरोबर अपक्षांनी भाजप पदाधिकारी तसेच इच्छुकांसाठी फोनाफोनी सुरू केली. तुम्ही लढा आम्ही सोबत आहोत, असे सांगण्यात येत होते. भाजपने उमेदवार दिला तर अपक्षांची ‘चांदी’ होणार आहे. जर युती झाल्यास अपक्षांचा ‘भाव’ एकदम खाली येईल. त्यामुळे काहीही करून युती तुटावी अन‌् आपली दिवाळी साजरी व्हावी, अशी अपक्षांची इच्छा आहे. युती तुटल्यास १७ अपक्षांच्या मदतीशिवाय कोणताही पक्ष बहुमतापर्यंत पोहाेचू शकणार नाही. 
 
भाईंच्या भेटीसाठी नाराज नांदेडकडे 
घोडेले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेले सेनेतील ओबीसी प्रवर्गाचे काही नगरसेवक नांदेडला रवाना झाले. निवडणूक प्रचारासाठी पालकमंत्री रामदास कदम नांदेडला तळ ठोकून आहेत. त्यांची भेट ही मंडळी घेणार असून नाराजी कळवण्याबरोबरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घालून देण्याची मागणी करतील. आम्हाला काय बोलायचे ते उद्धव साहेबांशी बोलणार असल्याचे यातील काहींनी सांगितले. 
 
घोडेलेच का? 
माजी महापौर विकास जैन त्याच तोडीचे उमेदवार असूनही घोडेलेंच्याच नावावर शिक्कामोर्तब का झाले, याची उत्सुकता अनेकांना आहे. या महापौरांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. यात सेना-भाजप युतीची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत पक्षाला एक चांगला चेहरा हवा होता. पुढील निवडणुकीत सेनेला भाजपशीच लढा देण्याची वेळ असेल, हेही पक्के आहे. अशा परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी तगडा नगरसेवक या पदावर असावा, असे पक्षाने ठरवले. 
बातम्या आणखी आहेत...