आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : पोलिस आयुक्त म्हणाले, घरफोड्यांसाठी नागरिकच जबाबदार; वेश्या व्यवसाय रडारवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या काय उपाययोजना आहेत, असा प्रश्न पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सोमवारी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पांत विचारला. त्यावर वाढत्या घरफोड्यांसाठी नागरिकच जबाबदार आहेत. घरफोड्यांना अटक करण्यासाठी आम्ही प्रयत्न तर करतच आहोत; पण नागरिकांनीही दक्ष असायला हवे, असेही पोलिस आयुक्त म्हणाले. सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. 
 
गेल्या महिनाभरात माजी नगरसेवक आगा खान, रेणुका वाडकर यांच्या घरात चोरी झाली, तर संजय केणेकर यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. याशिवाय सिडको पोलिस ठाण्याच्या बाजूलाच घरफोडीचा प्रकार घडला आहे. उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडून दागिने पळवण्यात आले. शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. तुलनेत घरफोड्या उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. 
 
पोलिस आयुक्तांच्या मते किमान शहरातील सुशिक्षित नागरिकांनी तरी बँक लॉकर्सचा उपयोग करावा. दागिने आणि रोख रक्कम लॉकर्समध्येच ठेवावी. पण तसे होत नाही. सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. पोलिस अथक परिश्रम करीतच आहेत. मात्र, नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. मागील वर्षीपेक्षा या वर्षी गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावादेखील यादव यांनी केला आहे. 
 
रोज किमान दोन घरफोड्या 
शहरात रोज किमान दोन घरफोड्या होत आहेत. गेल्या सहा महिन्यांतील किरकोळ आणि मोठ्या घरफोड्यांचा आकडा हजारापर्यंत गेला. यात साताऱ्यातील सुधाकरनगरातील चड्डी-बनियन गँगने घातलेला दरोडा, आकाशवाणी चौकातील बँकेवर दरोड्याचा प्रयत्न, पडेगाव येथे कुटुंब घरात झोपलेले असताना झालेली चोरी, सिडको पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या अपार्टमेंटमधून पळवलेला लाखोंचा मुद्देमाल याचा समावेश आहे. या कुठल्याही घटनेतील तपास अजून पुढे सरकलेला दिसून येत नाही. 
 
वेश्या व्यवसाय रडारवर 
शहरातील वेश्या व्यवसाय पोलिसांच्या रडारवर आहे. पुणे, मुंबई येथील काही तरुणी, महिला शहरात येऊन व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. मागील दोन महिन्यांत गुन्हे शाखेने दोन कुंटणखान्यांवर कारवाई केली. शहरात सध्या हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली असून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्यवसायातील दलालांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. या गोरखधंद्याला पाठीशी घालणाऱ्या साखळीवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यादव यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...