आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागातून बीड जिल्ह्याचा बोलबाला, औरंगाबादचा निकाल 89.56 टक्के

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील एका शाळेत मुलींनी असा जल्लोष केला. (छाया: अरुण तळेकर) - Divya Marathi
निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील एका शाळेत मुलींनी असा जल्लोष केला. (छाया: अरुण तळेकर)
औरंगाबाद - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या जिल्हानिहाय निकालात औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याने ९२.६५ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले असून, औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८९.५६ टक्के, तर विभागाचा एकूण निकाल ८८.१५ टक्के  लागला.  

औरंगाबाद विभागातून यंदा नोंदणी केलेल्या १ लाख ८४ हजार २८३ विद्यार्थ्यांपैकी १ लख ८३ हजार २३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १ लाख ६१ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद जिल्ह्यातून ६४ हजार ५०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६४ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ५७ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  यामध्ये ६ हजार १७० दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदा विद्यार्थ्यांना चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला यासाठी मिळालेल्या सवलतीच्या गुणांचादेखील फायदा मिळाला.  
 
सवलतीच्या गुणांचा पाऊस   
राज्यात ४१ हजार ७३६, तर औरंगाबाद विभागात ४०४७ विद्यार्थ्यांना फायदा शासनाने यंदापासून लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यात ४१ हजार ७३६, तर औरंगाबाद विभागात ४ हजार ४७ विद्यार्थ्यांना या सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाला. क्रीडा क्षेत्रात असणाऱ्या ३७८ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले.  
 
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, अभिनय या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव २५ गुण देण्यात आले. मंडळाने यासंदर्भात पत्र, शासननिर्णय पाठवून प्रास्ताव मागवले होते. त्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 
 
मान्यताप्राप्त संस्थेच्या किमान तीन परीक्षा देणारा विद्यार्थी, राज्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार, चित्रकला परीक्षा देणारे विद्यार्थी यांना या गुणांचा लाभ मिळाला आहे. सांस्कृतिक विभागाची मान्यता, धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी, दहा वर्षे जुन्या आणि तीन वर्षे लेखा परीक्षण केलेल्या संस्थांची प्रमाणपत्रे यासाठी ग्राह्य धरण्यात आली होती. यानंतर विभागातून मंडळाकडे ५ हजार २४ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ४ हजार ४७ जण या वाढीव गुणांच्या सवलतीसाठी पात्र ठरले आहेत. वाढीव गुणांच्या या निर्णयावर अनेक मतमतांतरे होती. 
 
गुणांची खैरात वाटण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चाही झाल्याने हा शासन निर्णय वादात सापडला होता. पण पहिल्याच वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आले. या प्रस्तावांवर तपासणी करून निकाल लावण्यास विलंबदेखील झाला. परंतु पुढील वर्षी अशी अडचण येणार नाही, असे  विभागीय मंडळाचे अध्यक्ष शिशिर घोनमोडे यांनी सांगितले.
 
२४ जूनला गुणपत्रिका मिळतील : दरम्यान, मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत २४ जूनला  दुपारी ३ वाजता मिळणार आहेत.
 
त्या ५१ शाळा बंद करण्याचा प्रस्ताव    
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीसाठी शाळा आहेत. वर्गही आहेत, परंतु असे असूनही परीक्षेला मात्र विद्यार्थी बसलेच नाहीत. अशा एकूण ५१ शाळा विभागात आढळून आल्या होत्या. जर शाळा आहेत तर विद्यार्थी का नाहीत, असा सवाल करत बोर्डाने शिक्षण विभागास या शाळा बंद कराव्यात, असा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत शासनाला पाठवला जाणार आहे. 
 
आजपासून गुणपडताळणीची सुविधा   
बुधवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी मंडळाच्या वेबसाइटवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन गुणपत्रिकेची प्रत काढून ती स्वसाक्षांकित करून शुल्क भरावे. गुणपडताळणीचे अर्ज १४ ते २३ जूनदरम्यान, तर छायाप्रतीसाठी अर्ज १४ जून ते ३ जुलैपर्यंत विभागीय मंडळाकडे करायचा आहे.
 
पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळाकडे शुल्कासोबत अर्ज करायचा आहे. तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना जुलै, ऑगस्ट २०१७ आणि मार्च २०१८ अशा दोन परीक्षांच्या संधी उपलब्ध राहतील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यासाठी १९ जूनपासून अर्ज करता येतील.
 
पुढील स्लाइडवर वाचा, असा आहे जिल्हानिहाय निकाल ...   
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...