आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉडलर्स शाळेच्या अभ्यासक्रमात भारताच्या नकाशातून काश्मीर गायब!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  शहरातील टॉडलर्स नर्सरी या पूर्व प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर काही पालकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर हा प्रकार प्रिंट मिस्टेकमुळे झाल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. 
 
सिडको एन-३ परिसरामध्ये टॉडलर्स नर्सरी ही पूर्व प्राथमिक शाळा आहे. ज्युनियर केजी या वर्गासाठीच्या ‘होमवर्क वर्कशीट’मध्ये ही चूक झाली आहे. विशेष म्हणजे काश्मीर वगळलेला नकाशा एकाच पानावर नसून सहा पानांवर आहे. या नकाशामध्ये ‘इंडिया’ असे नमूद केलेले आहे. या सर्व प्रकारामुळे पालकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विद्यार्थी, पालकांना शाळेकडून नियमितपणे असाइनमेंट्स दिल्या जातात. या असाइनमेंटमध्ये जोड्या लावण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी काश्मीर वगळलेला भारताचा नकाशा दिलेला होता. काही पालकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना हा प्रकार नजरचुकीने झाला असेल, असे वाटले. मात्र, त्यानंतर वारंवार तसाच नकाशा येत आल्याने पालकांनी ई-मेल आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापनाकडे आक्षेप नोंदवला. 
 
शाळेने पालकांना पाठवले मेल : पालकांनी या प्रकारावर आक्षेप घेतल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने सर्व पालकांना खास मेल पाठवून हा प्रकार प्रिंट मिस्टेकमुळे झाल्याचे सांगितले. तसेच सर्व पुस्तके बदलून दिली जातील, ज्यात अखंड भारताचा नकाशा असेल, असेही आश्वासन दिले. 
 
आश्चर्य वाटते 
>काश्मीर हाभारताचा मुकुट आहे. भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून भारतभूमीच्या इंच इंच जमिनीचे रक्षण करते आणि इकडे अशा गंभीर चुका होतात, याचे आश्चर्य वाटते.
-एक पालक 
 
>आम्ही प्रायव्हेट व्हेंडर्सकडून पुस्तके छापून घेतो. त्यांच्याकडून ही चूक झाली आहे. आम्ही स्वत: काळजी घेऊन पालकांना ई-मेलद्वारे याबाबत कळवले असून सर्व पुस्तके बदलून दिली जाणार आहेत.
-इन्सियाहरहीम, संचालक,टॉडलर्स नर्सरी 
 
यांच्याकडूनही झाल्या चुका 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये काश्मीर वगळलेला भारताचा नकाशा लावलेला होता. तेव्हा देशभरातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला होता. 
- फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी इन्फोग्राफिक पेजवर भारताचा असाच नकाशा पोस्ट केला होता. 
- चीनच्या सरकारी टीव्हीनेदेखील असाच खोडसाळपणा केला होता. 
- अमेझॉन या ऑनलाइन शाॅपिंग कंपनीनेही भारताचा असाच नकाशा दाखवला होता. या चारही घटनांवेळी देशभरातून संताप व्यक्त झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...