आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधीच निर्जळी, त्यात नवे संकट: विजेची तार तुटताच दाबाच्या झटक्याने फुटली जलवाहिनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शनिवारपासून जायकवाडी पंपहाऊसमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने शहरातील अनेक भागांत पाणी आले नाही. रविवारी सायंकाळी चारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होताच रात्री दहा वाजता फारोळ्यात विद्युत खांबावरील तार तुटल्याने झटक्याने पुरवठा खंडित झाला. पाण्याचा दाबही वाढला. त्यामुळे पैठण रोडवरील अजित सीड्ससमोर १२०० व्यासाची जलवाहिनी एक मीटर लांबपर्यंत फुटल्याने मंगळवारी शहरात पाणी येणार नाही. 

जायकवाडीपासून शहरापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली जलवाहिनी ४० आणि २६ वर्षांपेक्षा जास्त जुनी झाली आहे. १० एमएम जाडीची जलवाहिनी दुरुस्ती नंतरच्या जोडण्यांमुळे तीन ते चार एमएमची झाली आहे. त्यामुळे विजेच्या झटक्यानेही जलवाहिनी फुटत असल्याचे आढळून आले आहे. जलवाहिनी जीर्ण झाल्याने केव्हाही फुटू शकते, असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. त्याचा प्रत्यय रविवारी आला. जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम भर पावसात सुरू होते. हे काम रात्री उशिरापर्यंत चालले. या वेळी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, सुहास शिरसाट, के. पी. धांडे आदी उपस्थित होते. 

चारऐवजी नऊ तास दुरुस्ती
दहावर्षांपूर्वी अशा ठिकाणची दुरुस्ती करण्यासाठी मनपाचे कर्मचारी आणि ठेकेदाराला केवळ चार तास लागत होते. मात्र जलवाहिनीची जाडी कमी झाल्याने येथे काम करण्यासाठी तास लागल्याचे दिसून आले. पावसामुळे ताडपत्रीच्या आधाराने दुरुस्ती सुरू होती. 

दुपारी वीज पुरवठा सुरळीत
पाऊससुरू असताना रात्री साडेदहा वाजता वीजपुरवठा करणारी मुख्य तार तुटली. वीज पुरवठा खंडित होताच दाबाचा झटका बसल्याने जलवाहिनी फुटली. रात्रीच जलवाहिनी रिकामी करून फोराळ्यात वीज दुरुस्ती सुरू करण्यात आली. सोमवारी दुपारी ४.३० वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला होता. 

दोन वेल्डरच्या साहाय्याने दुरुस्ती
एकमीटर लांब जलवाहिनीची जाडी कमी असल्याने दुरुस्तीस विलंब लागू नये म्हणून पाइप कापून त्यावर थेट लोखंडी प्लेट लावून वेल्डिंग करण्यात येत होती. त्यासाठी दोन वेल्डर नियुक्त करण्यात आले आहेत. 

रात्रीबारानंतर पाणी येण्याची शक्यता
सायंकाळी सातपर्यंत दुरुस्ती सुरू होती. वेल्डिंग थंड होण्यासाठी एक तास देण्यात आला. त्यानंतर फारोळयातून सिंगल पंपने पाइपमधील हवा काढण्यास तास लागले. त्यानंतर नक्षत्रवाडीत पाणी पोहोचले. टप्प्याटप्प्याने इतर सात पंप सुरू केल्यानंतर १२ नंतर काही प्रमाणात पाणी नक्षत्रवाडीपर्यंत येत होते. 

मुख्य अभियंत्यांनी केली पाहणी
वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पथकासह सोमवारी जायकवाडी, ढोरकीन, फारोळा येथील केंद्राची पाहणी केली. पुन्हा व्यत्यय येऊ नये, याची काळजी घेण्याचे आदेशही दिले. 

या भागांत येईल
एन-५ गुलमोहर कॉलनी, सावरकर नगर, वेदांत नगर, बन्सीलालगनर, एमआयडीसी परिसर रेल्वे स्टेशन, क्रांती चौक, रमानगर, उस्मानपुरा, श्रेयनगर, गांधीनगर, विद्यापीठ, लक्ष्मी कॉलनी, पडेगाव, भोईवाडा, मिनकॉर्नर, खडकेश्वर, काल्डा कॉर्नर, बालाजीनगर, विष्णूनगर, भानुदासनगर, अरिहंतनगर, संत एकनाथ हौसिंग सोसायटी, सेव्हन हिल्स कॉलनी, सत्यमनगर, एन-७, बजरंग कॉलनी, अविष्कार कॉलनी, सिडको टाऊन सेंटर, एन-६ साईनगर, सिंहगड कॉलनी, पवन नगर, काशी विश्वेश्वर कॉलनी, एन-११, मयुर पार्क, शहागंज, शहा बाजार, काचीवाडा, चाऊस कॉलनी, नवाबपुरा, रशीद कॉलनी, इंदिरानगर, नागसेन कॉलनी, रोहिदास पुरा, समी कॉलनी. 

अजूनएक दिवस विलंबाने पाणी
रविवारचा पाणीपुरवठा सोमवारवर गेला होता. रविवारी रात्रीच जलवाहिनीत बिघाड झाल्याने सोमवारीही पाणी मिळाले नाही असे कार्यकारी अभियंता, सरताजसिंग चहल म्हणाले. 

५३ वर्षे जुनी वितरण व्यवस्था
चिकलठाणाएमआयडीसी १९६२ मध्ये अस्तित्वात आली. त्याला ५३ वर्षे होत आहे. वीज ग्राहकांची संख्याही भरमसाठ वाढूनही वीज वितरण व्यवस्था तीच असून वाहिन्य, विजेचे खांबही जीर्ण झाले आहेत. 

या भागात आज पाणी नाही 
एन-६, मथुरानगर, एन- ८, एन-१, नारेगाव, एन-९, एन-१२, छत्रपतीनगर, दिल्ली गेट, हर्सूल, सुरेवाडी, नेहरूनगर, सादफ कॉलनी, हत्तेसिंगपुरा, त्रिमूर्ती कॉलनी, एसटी कॉलनी, बारी कॉलनी, भवानी नगर, निजामनगर यासह शहरातील अनेक भागात निर्जळी असेल. 
बातम्या आणखी आहेत...