आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद गमावण्याची भाजपला धास्ती, शिवसेना नेते झाले निर्धास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- १९ वर्षांच्या कालखंडानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे येण्याची चिन्हे असतानाच युतीत ‘दरार’ पडण्याचे संकेत मिळाल्याने भाजपच्या गोटात धास्ती निर्माण झाली आहे. मुंबईत सेनेने भाजपला सोबत घेतले नाही तर येथेही तसेच होईल अन्् अध्यक्षपद आपल्याला मिळणार नाही, हे भाजपला स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे शिवसेना हा हिंदुत्ववादी विचार बदलणार नाही आणि जर त्यांनी बदललाच तर आम्ही थेट विरोधी बाकावर बसू, असे भाजपने जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या इतिहासात १९९८ मध्ये प्रथमच येथील अध्यक्षपद महिन्यांसाठी का होईना भाजपकडे गेले होते. त्यानंतर युतीची सत्ता असताना भाजपला कायम उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले आहे. कारण भाजपची सदस्यसंख्या ही कायम कमीच राहिली. यंदाच्या निवडणुकीत युती नसतानाही भाजपने ६२ सदस्यांच्या सभागृहात २३ एवढी सदस्यसंख्या गाठली. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्या खालोखाल सेनेला (१८) यश आले. दोन्ही पक्ष मिळून आरामात सत्तेत येणार हे स्पष्ट असले तरी युतीत मतभेद झाले आणि सहजासहजी मिळणारी सत्ता, अध्यक्षपद मिळणार नाही, असे भाजपला वाटू लागले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांपासून जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, विजयाचे श्रेय मिळालेले जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव ही मंडळी काहीशी धास्तावलेली आहेत. 

निकालानंतर लगेचच भाजपने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु जोपर्यंत ‘मातोश्री’वरून आदेश येत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही बोलणार नाही, असे सेनेने स्पष्ट केले आहे. मुंबईहून आदेश हे मुंबई मनपाच्या निर्णयानंतरच येणार हे स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई महानगरपालिका गमवायची नाही, त्यामुळे तेथे शिवसेनेकडून वेगवेगळे प्रयोग केले जाऊ शकतील. तसे झाले तर येथे भाजपला फटका बसेल. 

कधी नव्हे तर जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधी बाकावर बसण्याची वेळ भाजपवर येऊ शकते, अशी भीती या नेत्यांना आहे. कारण मावळत्या सभागृहात शिवसेना हा १९ जागांसह सर्वात मोठा पक्ष होता. परंतु दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसने राष्ट्रवादी तसेच मनसेला सोबत घेऊन पाच वर्षे येथे सत्ता केली. तसाच प्रकार आपल्याबाबतीत घडू नये, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. हातातोंडाशी आलेला घास जाऊ नये, असे त्यांना वाटणे साहजिक आहे. 

दुसरीकडे भाजपने इतिहासात प्रथमच सेनेवर मात केली असली तरी याक्षणी शिवसेना नेते निर्धास्त आहेत. कारण त्यांना स्वत: काहीही करायचे नाही. मुंबईत जो काही निर्णय होईल, त्यानुसार येथे भाजपला सांगितले जाईल. त्यामुळे सत्ता मिळवणे किंवा गमावणे हा त्यांच्यासाठी विषय नाही. फक्त आदेश एवढ्याच विषयावर ही मंडळी थांबलेली आहेत. आम्हाला शिवसेनेबरोबर युती करण्याची इच्छा आहे. परंतू जर शिवसेनेने आपले विचार बदलले तर विरोधी बाकावर बसू. परंतू कुठल्याही परिस्थितीत इतर पक्षाशी युती करणार नाही,असे डॉ. कराड यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...