आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55 वॉर्डांतील कचराकुंड्या हटूनही स्वच्छता यादीत औरंगाबाद वर्षभरात 56 वरून 299 व्या क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्रसरकारने गुरुवारी देशभरातील सर्वाधिक स्वच्छ, कचरामुक्त असलेल्या शहरांची यादी जाहीर केली. त्यात ५३४ शहरांत औरंगाबादचा २९९ वा क्रमांक आला आहे. तो २०१६ मध्ये ५६ वा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सफाईमध्ये लोकसहभाग वाढला. ५५ वॉर्डांतील कचराकुंड्या हटल्या तरीही क्रमवारीत एवढी घसरण होण्याएवढी स्थिती बिघडली आहे का? असा मुद्दा उपस्थित होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत खासगी संस्थेने केलेल्या तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील स्वच्छता आणि शौचालयांची बांधणी यासह कचरा संकलन, विल्हेवाट आणि कचऱ्यावर करण्यात येत असलेली प्रक्रिया याची पाहणी करण्यासाठी १९ ते २१ जानेवारी २०१७ दरम्यान शहरात केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेचे पथक आले होते. 
 
या पथकाच्या प्रमुखानेच क्रमवारीत वरचा क्रमांक देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी त्यास स्पष्ट नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचून लाचखोरांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात केंद्राची दुसरी समिती आली होती. त्यांनी दोनच दिवसांत पाहणी करून थेट केंद्र सरकारला अहवाल दिला होता. त्या पाहणीचा निकाल गुरुवारी लागला आणि सफाईत शहराची मोठी घसरण झाल्याचे समोर आले. गेल्यावर्षी शहराचा ५६ वा क्रमांक आला होता. त्यात थोडा जोर लावून शहराला पहिल्या टॉप टेनमध्ये आणण्याचा संकल्प बकोरिया यांनी केला होता. त्यानुसार कामालाही प्रारंभ केला होता. मात्र, वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचेही उद्दिष्ट गाठता आले नाही, याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, एकूण सफाई कामाबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे लाचखोरी प्रकरणाचा फटका बसल्याचा सूर मनपा वर्तुळात व्यक्त झाला. 
 
एवढे बकाल...मुळीच नाही 
यासंदर्भात‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने काही मान्यवरांशी संपर्क साधला असता त्यांनीही ५६ वरून २९९ व्या क्रमांकावर घसरण्याइतपत औरंगाबाद बकाल नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत धिम्या गतीने का होईना प्रगती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक कितपत नि:पक्षपाती होते, याविषयीही त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
 
स्थळपाहणी कागदपत्रांत कमी पडलो 
-शहराच्या विविध भागांतील स्थळपाहणी आणि केंद्राच्या समितीला कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात कमी पडलो. कचरा प्रक्रिया, सार्वजनिक स्वच्छतेत चांगली कामगिरी असूनही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. पुढील वर्षी अधिक मेहनत घेऊ. विक्रममांडुरके, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन 
 
दीड लाख दिले तर टॉप टेनमध्ये 
शहरात जानेवारीत पहिले पथक आले होते. या पथकाच्या प्रमुखाने दीड लाख रुपये दिले तर तुमचे शहर पहिल्या दहा क्रमांकात टाकू, असे म्हटले होते. 
 
२००० पैकी ७९४ गुण मिळाले 
९०० गुण मनपाच्या कागदपत्रांसाठी होते. त्यात घनकचरा व्यवस्थापन आणि खुल्या जागेवर शौचविधीपासून लोकांना रोखण्यासाठी काय केले याचाही समावेश होता. मनपाला १०० पेक्षा कमी गुण मिळाले. 
 
 ५०० गुणस्थळ पाहणीसाठी 
 १४७ गुण मिळाले. 
 ६०० गुणनागरिकांच्या प्रतिक्रियांवर 
 २६९ गुण मिळाले. 
 
या मुद्द्यांवर झाला निर्णय 
४० % कचरा गोळा करणे, सफाई
२० % कचरा प्रक्रिया, विल्हेवाट 
३० % खुल्या जागेवर शौचविधी, शौचालये 
०५ % जनजागृती आणि त्याचा परिणाम 
०५ % ई-लर्निंग पोर्टल 
 
७२ वॉर्डांत माझी सिटी टकाटक 
सध्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम ११५ पैकी ७२ वॉर्डांत सुरू आहे. ५५ वॉर्डांमध्ये कचराकुंड्या हटल्या आहेत. 
 
लोक सहभाग वाढला तरीही ... 

टुरिस्ट प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंत सिंग 
एवढी घसरण होण्याइतपत शहर बकाल झालेले नाही. तपासणी पथकाच्या लाचखोरीचा फटका क्रमवारीला बसला असावा. 
 
आयएमएचे अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल 
लोकांमध्ये जागरूकता वाढून ते स्वत:हून सफाईसाठी पुढाकार घेत आहेत. गती कमी असली तरी प्रगती आहे. 
 
अमरप्रीत हॉटेलचे सीईओ हरप्रीतसिंग निऱ्ह 
गेल्या वर्षात अनेक भागांतील कचराकुंड्या हटल्याचे दिसते. पूर्वीच्या तुलनेत वर्षभरात शहर स्वच्छ झाले. तरीही २९९ क्रमांक कशामुळे, असा प्रश्न पडतो. 
 
 
बातम्या आणखी आहेत...