आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: घुशींनी पोखरला राष्ट्रीय महामार्ग, 11 किलोमीटर लांब, 30 मीटरची भगदाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उतार केला नाही, वॉटर ड्रेनिंग सिस्टिम नाही म्हणून रस्ते खराब झाल्याची अनेक उदाहरणे समोर येतात. पण औरंगाबाद शहरालगतचा सर्वाधिक जड वाहतुकीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा बीड बायपास आठ ठिकाणी घुशींनी पोखरल्याने खराब झाला आहे. 

सध्या रस्त्यावर मोठी भगदाडे दिसत नसली तरी कधीही एखादे मोठे वाहन खचू शकते, अशी स्थिती आहे. घुशींना रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या २५० मंगल कार्यालय, ढाबे, हॉटेलचालकांना नाल्याजवळ, रस्त्यालगत खरकटे तसेच उरलेले अन्न फेकू नका, अशा नोटिसाही बजावल्या आहेत. 

१५ वर्षांपूर्वी सुमारे ३० कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर त्याची वारंवार डागडुजी केली जाते तरीही रस्ता खचण्याचे प्रकार सुरू होते. वर्षभरापूर्वी तर आठ ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आले. त्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने ही भगदाडे बुजवली. मात्र, दर्जेदार साहित्य वापरूनही आणि पावसाचे पाणी तुंबावे अशीही स्थिती नसताना रस्त्याची अवस्था अशी का होते याचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले. तेव्हा असे लक्षात आले की, सुमारे ११ किमी लांब रस्त्यावर तब्बल २५० छोटी-मोठी हॉटेल्स आणि ढाबे, मंगल कार्यालये आहेत. तेथे कचरा गोळा करण्यासाठी मनपाची यंत्रणा नाही. त्यामुळे हॉटेलचालक नाल्याच्या काठावर, रस्त्यालगतच उरलेले खरकटे अन्न टाकतात. ते खाण्यासाठी रात्री घुशींची झुंबड उडते. खरकटे खाता खाता या घुशी रस्ताही पोखरून टाकत आहेत. त्यांनी पुलाच्या कठड्याखाली मोठमोठी बिळे केली आहेत. पथकाने दिलेल्या माहितीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाने हॉटेलचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. रस्त्यालगत, पुलांखाली उरलेले अन्न टाकू नका, असे त्यात म्हटले आहे.
 
राष्ट्रीय महामार्गाला धोका...
हारस्ता लवकरच राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित होणार असून येथून सोलापूर-धुळे हा २११ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याला अधिक महत्त्व आहे. पण येथे घुशींचा मोठा धोका निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या शोधात आहे. 

हे काम तर मनपाचेच 
उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी बीड बायपास रस्ता पुलाची जागा वापरू नका, अशा नोटिसा हॉटेलचालकांना दिल्या आहेत. मात्र, मुळात हे काम आमचे नाही. पुलाखालची स्वच्छता मनपाने करायला हवी. रस्त्यालगतचे कचऱ्याचे ढिगारेही मनपानेच हटवले पाहिजेत. 
- अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग 

कचऱ्याचे ढिगारेही 
या रस्त्याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नाही. अकरा किलोमीटर लांब, ३० मीटर रुंद रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारेही घुशींना निमंत्रण देत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. 
बातम्या आणखी आहेत...