आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय भद्राचा जयघोष... चार लाख भाविक भद्राचरणी; उन्हामुळे गर्दीचे प्रमाण कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- पवनपुत्र हनुमान की जय.. जय बोलो भद्रा.. च्या जयघोषाने औरंगाबाद - खुलताबाद मार्ग रात्रीपासूनच दणाणून गेला होता. हनुमान जयंतीनिमित्त भद्रा मारुतीचे सुमारे चार लाख भाविकांनी दर्शन घेतले. सोमवारी रात्रभर दर्शनासाठी रांगा होत्या. परंतु मंगळवारी सकाळपासून दर्शनासाठी रांगा दिसून आल्या नाहीत. उन्हाच्या कडाक्यापासून बचावासाठी भक्त भाविकांनी रात्रीपासून ते पहाटे पाचपर्यंत दर्शन घेण्यावर भर दिल्याचे दिसून आले. 

मार्गावर विविध संस्था- संघटनांच्या वतीने भाविकांच्या चहापान व फराळाची सोय करण्यात आली होती. तर मंदिराच्या वतीने भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ग्रामीण पोलिस निरीक्षक नवीनचंद्र रेड्डी व पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  
 
भद्रा मारुती संस्थानच्या वतीने मंगळवारी  पहाटे ४ वाजता अभिषेक करण्यास प्रारंभ करण्यात अाला अभिषेक सुमारे दोन तास चालला. त्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तथा संस्थानचे उपाध्यक्ष अतुल सावे, अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, सचिव कचरू पाटील बारगळ, बाबासाहेब बारगळ, किशोरसेठ अग्रवाल, पोपटशेठ जैन यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली. 
  
हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी औरंगाबादसह कन्नड, फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, काेपरगाव, नेवासा, जालना येथून भाविकांनी गर्दी केली होती, तर औरंगाबाद परिसरातील भाविकांनी सोमवारी दुपारी चार वाजेनंतर दर्शनसाठी खुलताबादकडे घोळक्याने निघाल्याचे चित्र रस्त्यावर दिसून आले. रात्रभर पायी येणाऱ्या भाविकांची गर्दी दिसून आली. रात्रभरात सुमारे अडीच लाख भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले.  त्या तुलनेत मंगळवारी दिवसभर गर्दीचे प्रमाण कमी दिसून आले. भाविकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी परिसरात मोठा मंडप टाकण्यात आला होता. 

१५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची होती नजर
भद्रा मारुती मंदिर परिसरात पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यात हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर हाेती. तर १ पोलिस निरीक्षक, ६ पोलिस उपनिरीक्षक, ११३ पोलिस कर्मचारी, १७ महिला  कर्मचारी, २ दंगाकाबू पथके, १ डाॅग युनिट असा तगडा पोलिस बंदोबस्त होता. संस्थानच्या वतीने सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी सुरक्षा रक्षक तैनात केले होते.

मूर्तीला रेशमी सजावट 
औरंगाबाद येथील जयसुबसेठ मिठाईवाले यांच्या वतीने भद्रा मारुती मूर्तीला रेशमी अशी सुंदर सजावट करण्यात आली होती. मूर्तीचे रूप पाहून भाविक आकर्षित होत थांबून डोळ्यात मूर्तीचे रूप साठवून दर्शन घेत पुढे चालत होते.

जड वाहने वळवली
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रस्त्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी दौलताबाद टी पॉइंट येथून वाहने वळवण्यात आली होती. आैरंगाबाद येथून खुलताबाद मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने दौलताबाद टी पॉइंट येथून कसाबखेडा फाटा येथून वळवण्यात आली होती.

नारळ, पानफुले विक्रेत्यांसह हॉटेलवाल्यांची चांदी
भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे नारळ, पानफुले व परिसरातील हॉटेल चालकांची चांगली उलाढाल झाली. भाविकांची दिवसभर गर्दी होती. 
बातम्या आणखी आहेत...