आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 संस्थांनी केली बिब्बा फोडणाऱ्या यंत्राची निर्मिती, संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत पोहोचला होता प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संक्रांतीचे वाण, डिंकाचे लाडू आणि पानमसाल्यात वापरली जाणारी गोडंबी बिब्बा दगडाने ठेचून बाहेर काढावी लागते. औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो कुटुंबे पिढ्यान््पिढ्या हा व्यवसाय करतात. बिब्बा ठेचताना कामगारांची बोटे फुटतात. त्याच्या रसाने त्वचा जळते, अंगही सुजते. त्यातून त्यांना दिलासा देण्यासाठी औरंगाबादेतील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने हा प्रश्न संयुक्त राष्ट्रापर्यंत पोहोचवला. तब्बल ११ संस्थांच्या प्रयत्नातून बिब्बे फोडण्याचे यंत्र तयार केले. यामुळे कामगार सुरक्षित झाले. गोडंबी काढण्याचा वेगही वाढला. जगभरात कोठेही बिब्बा फोडण्याचे काम होत असेल तर असे यंत्र तयार करता येऊ शकते.

मंडळातर्फे खांबखेडा (ता. फुलंब्री) येथे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रात  २००५ मध्ये डॉ. प्रतिभा फाटक यांना एका महिलेची बोटे आणि हातावरील त्वचा जळालेली, चेहरा सुजलेला दिसला. म्हणून डाॅ. फाटक यांनी बिब्बे फोडणाऱ्यांना ग्लोव्हज दिले. पण त्याने बिब्बा फोडण्यासाठी आवश्यक असलेली पकड येत नव्हती. परभणी कृषी विद्यापीठातील प्रा. ए. जी. कांबळे यांनी तयार केलेले एक यंत्रही उपयुक्त ठरले नाही.  

१० हजार कुटुंबे : फुलंब्री (खांबखेडा, लिंगदरी), सिल्लोड, अजिंठा (वसई, घटांब्रा, मोहोळ) येथे मल्हार कोळी समाजाचे लोक बिब्बा फोडतात. जालन्यातील हळदा, उंडणगाव, भारण आणि लोणारला ओडिशातून बिब्बा मागवतात. लोहा, मुखेड, मुदखेड तसेच वाशीम, अकोला, यवतमाळमध्ये आठ ते १० हजार कुटुंबे या व्यवसायात आहेत. 

यंत्रनिर्मितीला आला वेग
२०१०-११ मध्ये नागपूरचे मेकॅनिकल इंजिनिअर मिलिंद जोशी यांनी स्वामी विवेकानंद समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. उद्योजक त्र्यंबक (अण्णा) लिमये यांनी आव्हान स्वीकारत आठ नवी यंत्रे तयार केली. नाबार्डच्या रुरल इनोव्हेशन्स फंड्स प्रकल्पाअंंतर्गत जालन्यातील उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी पायाने  चालणारे यंत्र बनवले. सध्या आयआयटी पवईचे एमटेकचे विद्यार्थी यात आणखी संशोधन करत आहेत.  मंडळाचे प्रकल्प अधिकारी सुहास आजगावकर यांनी जगभरात अशा व्यवसायातील लोकांना मदत व्हावी म्हणून यंत्रनिर्मिती प्रकल्प संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमामध्ये (यूएनडीपी) पाठवला. त्यास मंजुरी मिळाली. या कामात प्रमोद कुलकर्णी, विजय होनकळस्कर, दादाराव डफळ आणि गजानन साईखेडकर यांनीही सहकार्य केले.

२० ते २२ कोटींची उलाढाल
अजिंठ्यातील मंडळाचे सदस्य दादाराव डफळ यांनी फार्मर्स प्रोड्युसर असोसिएशन स्थापन करून १०० बिब्बे उत्पादक शेतकरी जोडले आहेत. वन खात्याच्या अखत्यारीतील झाडांवरून बिब्बे  विकत घेतले जात आहेत. गेल्या वर्षी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून १० क्विंटल गोडंबीची विक्री झाली. कुटीर स्वरूपाच्या या व्यवसायातून राज्यात वर्षाकाठी २० ते २२ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.  

गोडंबीचे तेलही
दगडाने फोडत कामगार दररोज फार तर पाच तास काम करत. यंत्रामुळे ते सहा ते सात तास बसून दहा किलो बिब्बे फोडत आहेत. ७ किलो बिब्ब्यातून  १ किलो गोडंबी आणि साडेपाच किलो टरफल निघते. या टरफलातून १ लिटर बिब्बा नटशेल तेल निघते. ते औषधींमध्ये तसेच जहाजांच्या तक्तपोसासाठी जलरोधक म्हणून वापरले जाते. 
बातम्या आणखी आहेत...