आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये पर्यटनाचा आनंद अन् निसर्ग शिक्षणाचीही सोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुलशन महाल परिसरात होत असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कला पर्यटनासह निसर्ग शिक्षणाचीही जोड दिली जाणार आहे. गतवर्षी मंजूर झालेल्या या पार्कमध्ये केवळ काही वनस्पती, वेली लावण्याचे नियोजन होते. मात्र, शहरातील मोक्याची जागा आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन येथे आता पर्यटन आणि निसर्ग शिक्षणाच्या दृष्टीने वन विभागामार्फत सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एकूण कोटी ७७ लाख रुपयांचा हा प्रस्ताव असून वन विभागाच्या नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वन संरक्षकांना पाठवण्यात आला आहे.
जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य आणि अजोड ऐतिहासिक वास्तूंची खाण असलेल्या गुलशन महाल परिसराच्या विकासासाठी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयही याच परिसरामध्ये आहे. निझाम काळामध्ये येथे उभारलेला राजवाडा, नहरी, बारव तसेच पाणी उसळत पुढे झेपावेल अशा पद्धतीने तयार केलेले कालवे हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. मात्र, आज विभागीय आयुक्तांचे निवासस्थान सोडले तर परिसर बकाल झालेला आहे. ठिकठिकाणी बेशिस्तपणे वाढलेली झाडे, पावसाळ्यात वाढणाऱ्या गाजरगवताने हा परिसर बेदखल झाला आहे. तसेच निझाम काळामध्ये बांधकामाद्वारे तयार केलेल्या ऐतिहासिक वास्तूही आता खिळखिळ्या झाल्या आहेत. या भागामध्ये अजूनही महाकाय वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. यात विशेषत: अांब्यांच्या झाडांचा समावेश आहे.
जैवविविधता उद्यानासाठी ही योग्य जागा असल्याने विभागीय आयुक्तांनी या परिसरातील एकर जागा वन विभागाला देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार वन विभागाने गतवर्षी पाच वर्षांकरिता ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठवला होता. मात्र, यात झाडे, वेली लावण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही बाबींचा समावेश नसल्याने आयुक्तांनी त्रयस्त एजन्सी नेमून या भागाचा विकास करण्याबाबत वन विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वन विभागाने आता सुधारित प्रस्ताव तयार केला असून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवला आहे.

काय आहे नवीन प्रस्तावामध्ये ?
{सर्व प्रकारच्या वनस्पती, वेलींची लागवड करणे.
{ मोडकळीस आलेल्या ऐतिहासिक भिंती, इमारती, विहिरी, नहरी आणि कालव्यांची बांधकामाद्वारे दुरुस्ती करणे.
{ संपूर्ण उद्यानामध्ये अडीच मीटर रुंदीच्या जवळपास एक किलोमीटर लांबीच्या पायवाटा तयार करणे.
{ पायवाटांच्या दुतर्फा सावली देणाऱ्या मोठ्या वृक्षांची लागवड करणे.
{ २४ प्रकारची भारतीय वंशाची झाडे, आठ प्रकारच्या सुवासिक वनस्पती, १८ प्रकारच्या औषधी वनस्पती, तीन प्रकारची शोभेच्या झुडपांची लागवड करणे.
{ या परिसरातील आग्नेय भागात असलेल्या विहिरीच्या बाजूला जुना ओटा आहे. जेथून पूर्ण परिसर न्याहाळता येतो. या ओट्यांची दुरुस्ती करणे
{ दुरुस्ती करताना या वास्तूंचे मूळ मूल्य जाणार नाही अशाच वस्तू, रसायनांचा उपयोग करणे

पर्यटन आणि निसर्ग शिक्षण
गुलशन महाल हा परिसर शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे शहरवासीय वीकेंडसह अन्य सुट्यांना येथे फिरायला येतील असे नियोजन आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येणारे पर्यटकही येथे आकर्षित होतील. प्रत्येक ठिकाणी वास्तू, झाडे, वेलींची परिपूर्ण माहिती देणारे फलक लावले जाणार आहेत.

जैवविविधता आणि वास्तूंचे संवर्धन होईल
आपल्या ऐतिहासिकवारशांचे जतन करणे हे आपले काम आहे. येथे ऐतिहासिक वास्तू तर आहेतच, सोबतच निसर्गाचे दाण आहेच. त्यामुळे येथे जैवविविधता उद्यान होणे गरजेचे आहे. यातून जैवविविधतेसोबत एेतिहासिक वास्तूंचे संवर्धन होईल. तसेच पर्यटन आणि निसर्ग शिक्षण हे दोन महत्त्वाचे उद्देश आहेत. उमाकांत दांगट, विभागीयआयुक्त
बातम्या आणखी आहेत...