आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमाचे बंधन; १० टक्केच मेंदू असलेले बाळ जन्म घेणार, माता-पित्यावर दुर्धर प्रसंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केवळ नियमांच्या बंधनामुळे ९० टक्के मेंदू विकसित झालेले बाळ जन्माला घालण्याची वेळ औरंगाबादच्या एका गरीब दांपत्यावर आली आहे. पोटातील बाळाला असलेल्या समस्या समजण्यास उशीर लागला नंतर तो गर्भ पाडून टाकण्याची परवानगी मागेपर्यंत २० आठवड्यांच्या वर कालावधी उलटून गेला. याच नियमामुळे मेडिकल बोर्डाने गर्भपात करणे योग्य राहणार नाही, असे मत व्यक्त केल्याने न्यायालयानेही कोणताही आदेश दिला नाही. परिणामी या बाळाला आता जन्म द्यावा लागणार आहे.
 
गारखेड्यातील किराणा दुकानदार शेख शरीफ शेख अलीम सायरा शेख (२१) या दांपत्याच्या आयुष्यात हा प्रकार घडला आहे. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात सायरा गरोदर राहिल्यानंतर डाॅ. सीमा भानप या स्त्री रोग तज्ज्ञांकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाचव्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सोनोग्राफीदरम्यान सायराच्या पोटातील बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होत नसल्याचे समोर आले.
 
त्याच काळात म्हणजे ११ मार्च रोजी विख्यात बालरोगतज्ज्ञ डाॅ. राजगोपाल तोतला त्यांच्या सहकाऱ्यांनी गरोदर मातांसाठी तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात बाळाला हायड्रेनेनसिफाली हा गंभीर विकार झाल्याचे समोर आले. यात बाळाच्या मेंदूची वाढ कमी किंवा होतच नाही. अधिक तपासणी केल्यावर बाळाला जवळपास मेंदूच नसून त्या जागी फक्त पाणीच असल्याचे समोर आले.
 
अशा बाळाच्या जगण्याबाबतच प्रश्नचिन्ह असल्याने गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका या जोडप्याने उच्च न्यायालयात दाखल केली. डाॅ. तोतला यांचा अहवाल तसेच मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील डाॅ. संतोष करमरकर, डाॅ. प्रशांत मिश्रा न्यूरोसर्जन डाॅ. भावना टाकळकर यांचीही मते जाणून घेतल्यावर बाळ २० आठवड्यांपेक्षाही अधिक कालावधीचे असल्याने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या मेडिकल बोर्डाकडून मान्यता आणावी, असे न्यायालयाने सांगितले.
 
मुंबईत मेडिकल बोर्डाच्या समक्ष शरीफ, सायरा यांनी तपासण्यांचे तसेच तज्ज्ञ डाॅक्टरांचे अहवाल सादर केले. केईएमचे डीन डाॅ. अविनाश सुपे, डाॅ. शुभांगी पारकर, डाॅ. अमर पझारे, डाॅ. इंद्राणी हेमंतकुमार, डाॅ. वाय. एस. नंदनवार, डाॅ. अनाहिता चौहान डाॅ. हेमांगिनी ठक्कर यांच्या बोर्डाने सर्व पडताळणी केली.
 
मात्र, तोपर्यंत हा गर्भ २८ आठवड्यांचा असल्याने गर्भपात करण्यास मान्यता देता येणार नाही, असे मत बोर्डाने व्यक्त केले. या अहवालानंतर उच्च न्यायालयानेही यासंदर्भात आदेशात म्हटले आहे की, मेडिकल बोर्डाने गर्भपात करता येईल असे म्हटले नसल्याने याचिकेचा विचार करता येणार नाही. या प्रकरणात शेख दांपत्याच्या वतीने अॅड. सुभाष मुंडे यांनी बाजू मांडली होती.
 
गर्भपाताची परवानगी शक्य नव्हती
शेख शरीफ सायरा शेख यांच्या प्रकरणातील सगळी कागदपत्रे तपासणी अहवाल आम्ही तपासले. याशिवाय आम्हीही तपासण्या केल्या. पण २८ आठवड्यांचा गर्भ हे जिवंत बाळच गृहीत धरले जाते. त्यामुळे गर्भपात करण्यास परवानगी देता येणे शक्य नव्हते.
- डाॅ. अविनाश सुपे (मेडिकल बोर्डाचे सदस्य)
 
नियमात बदलाची गरज
वैद्यकीयदृष्ट्या दोष असलेला गर्भ काढण्यासाठी मेडिकल बोर्डाची मान्यता लागते. या प्रकरणात मुळात बाळाला हायड्रेनेनसिफाली असल्याचे कळले तेव्हाच २० आठवडे उलटून गेले होते. पण हा दुर्धर आजार त्यावर काहीच उपचार नसल्याने आणि या दांपत्याची आर्थिक स्थितीही बिकट आहे. अशा विशिष्ट प्रकरणासाठी नियमांत बदल करण्याची गरज आहे.
- डाॅ. राजगोपाल तोतला

काय आहे हायड्रेनेनसिफाली?
बाळाच्यामेंदूचा काही भागच विकसित होते उर्वरित जागी पाणी असते. जो भाग विकसित होतो त्यातून नियंत्रित करणारे अवयव बाळ जन्माला आल्यावर काम करतात. पण अनेकदा मेंदूचा अत्यल्प भागच विकसित होत असल्याने जन्मल्यावरही या बाळाची देखभाल करणे अतिशय जिकिरीचे असते. भारतात हायड्रेनेनसिफालीचे प्रमाण दहा हजारांत एक एवढे आहे. या विकारावर कोणतेही उपचार नसल्याने बाळाची स्थिती गंभीरच असते. त्याच्या देखभालीवरही प्रचंड खर्च येतो.

{ गरोदरपणाच्या काळात अथवा गर्भपाताच्या वेळी सायराच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. मात्र, बाळामध्ये असलेले दोष पाहता जन्मानंतर शारीरिक मानसिक परिणाम होणार आहे.
{ क्लिनिकल सोनोग्राफिक तपासण्यांवरून गर्भ २८ आठवड्यांचा आहे. पोटातील बाळाला हायड्रेनेनसिफाली, शिवाय हात पायातही दोष आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...