आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमुळे धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना धोका : प्रा.जयदेव डोळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  उत्तरप्रदेशमध्ये घराणेशाहीचा पराभव केला, असे भाजपकडून सांगितले जात असताना बादल घराण्यातले चार नेते निवडणूक लढवत होते यावर ते बोलत नाहीत. लोकशाहीचा आधार घेऊन दांभिक, दुटप्पी, दगाबाज विचार पुढे येत असतील तर त्याचा काळजीपूर्वक विचार करायला हवा. तो भारतीय लोकशाहीला पूरक नाही. भाजपच्या विजयाने प्रजासत्ताक लोकशाही, सामाजिक न्याय समता या मूल्यांना प्रचंड धोका असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले.
 
 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने “पाच राज्यांच्या निवडणुकीचा अन्वयार्थ’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. एजीएमच्या आइन्स्टाइन हॉलमध्ये आयोजित परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, एशियन एजचे प्रतिनिधी अमेय तिरोडकर सहभागी होते. 
 
व्यासपीठावर प्रतापराव बोराडे, प्राचार्य रेखा शेळके, श्रीकांत देशपांडे यांची उपस्थिती होती. डोळे म्हणाले, सामाजिक न्यायाच्या बाबतीत अखिलेश आणि मायावती यांच्या सरकारने काहीच केले नाही, तर संघानेही काहीच केले नाही. भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा उत्तर प्रदेशमधून राबवायला सुरुवात होणार आहे. भाजपचे आता काँग्रेसीकरण झाले आहे. 
 
पूर्वी काँग्रेसही अशाच पद्धतीने समाजवादी शेकापच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणुका जिंकत असे. छोट्या जातींना एकत्र करणे, प्रादेशिक पक्षांच्या भावना लक्षात घेता त्यांना चिरडणे ही भ्रष्ट परंपरा काँग्रेसने केली होती. त्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून लोकांनी प्रादेशिक पक्ष तयार केले. हीच भ्रष्ट परंपरा भाजप चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
शरद पवारांची ‘विश्वास ठेवावा’ अशी प्रतिक्रिया : शरद पवार यांना चिमटा काढत डोळे म्हणाले, फार वर्षांनी शरद पवारांनी चांगली आणि विश्वास ठेवावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल फार उत्साह वाटणारा निकाल नाही आणि नाउमेद होण्यासारखाही नाही हे पवारांनी म्हटले ते खरे आहे.

उत्तर प्रदेश उत्तराखंड वगळता उर्वरित राज्यांत भाजपला फारसे यश आले नाही हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. 

भाजपचा विजय माधव फॉर्म्युल्याचे यश आहे. बर्दापूरकर म्हणाले, महाराष्ट्रात छोट्या जातींना एकत्रित करण्याचा जो प्रयत्न गोपीनाथ मुंडेंनी केला त्याच धर्तीवर राष्ट्रीय पातळीवर उत्तर प्रदेशमध्ये छोट्या जातींना एकत्रित करून भाजपने विजय मिळवला आहे.
 
 संघाने खूप मेहनत घेतली आहे. मात्र गोव्यात संघ नाराजीचा फटका भाजपला बसला आहे. भाजपने कुर्मा ३.५ टक्के, लोध २.५ टक्के, कुंभार दोन टक्के अशा विविध छोट्या जातींची मोट बांधली, मायक्रोप्लॅनिंग केल्याने फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात तेढ आहे.
 
 बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचा परिणाम जास्त झाला. या निकालामुळे भयसूचना मिळत असून आगामी काळात आणखी तेढ निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

या वेळी तिरोडकर यांनी मोदी हे कायम ट्विटर, फेसबुक यासह इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सोबत असतात. युवकांना ते आवडते. 
 
मात्र ‘दृश्यम’ चित्रपटात जसा आभास अजय देवगणने निर्माण केला त्यासारखी ही स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मायावतींचा पराभव चिंताजनक असून त्यामुळे एका समाजाचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न त्या समाजालाही वंचित ठेवण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत देशपांडे यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...