आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपशी घरोब्याची एमआयएमची तयारी, निधी दिल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत मदत करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएम नगरसेवकांच्या वॉर्डातील रस्त्यांसाठी भाजपच्या महापौरांनी २५ कोटी रुपयांची कामे डिफर पेमेंटवरून करण्यास मान्यता दिली. त्यामुळे या पक्षाचे स्थानिक नेते, नगरसेवक भाजपवर जाम खुश झाले आहेत. जर भाजपने आमच्या वॉर्डातील विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला तर पुढील महिन्यातील महापौरपदाच्या निवडणुकीत आपण भाजपच्या पाठीशी उभे राहू, असे स्थानिक नेते डॉ. गफार कादरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पालकमंत्री रामदास कदम यांनीही एमआयएम नगरसेवकांच्या वाॅर्डात निधी दिला आहे, तेव्हा त्यांनी भाजपपेक्षा जास्त निधी दिला तर शिवसेनेबरोबर जाणार का, या प्रश्नावर मात्र त्यांनी ते नंतर बघू, असे सांगून अप्रत्यक्ष नकारच दिला. 
 
विद्यमान महापौरांची मुदत ३१ ऑक्टोबरला संपत आहे. त्याआधी ही निवडणूक होईल. युतीच्या जागावाटपात पुढील अडीच वर्षांचे महापौरपद हे शिवसेनेकडे असले तरी ते मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी युती तोडण्याच्या कामालाही प्रारंभ झाल्याचे दिसून येते. युती तुटली तर भाजपबरोबर शिवसेनेलाही अपक्षांची मनधरणी करावी लागणार हे स्पष्ट आहे. युती तुटो अगर तुटो, एमआयएम आपला उमेदवार देणार, असे सर्वांनीच गृहीत धरले होते. परंतु भाजपने एमआयएम नगरसेवकांच्या वॉर्डातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये दिल्यानंतर त्यांचा विचार बदलण्याचे संकेत कादरी यांनी दिले. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘आम्ही विकासासाठी राजकारण करतो आणि लोकांना विकास हवा आहे. तेव्हा भाजपने जर आणखी विकास निधी आमच्या वाॅर्डांसाठी दिला तर महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्यासाठी विचार केला जाईल.’ गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेचे पालकमंत्री कदम यांनी एमआयएम नगरसेवकांच्या वाॅर्डासाठी निधी दिला आहे. आता भाजपपेक्षा शिवसेनेने जास्तीचा निधी दिला तर त्यांच्यासमवेत जाणार का, असा प्रश्न केला असता, ते नंतर बघू. राज्यात तसेच केंद्रात भाजपची सत्ता आहे, अशा सूचक शब्दांत त्यांनी शिवसेनेसोबत जाण्यास नकार दिला. 
 
मदत कोणाची घ्यायची, आम्ही ठरवू : एमआयएममदत करण्यास राजी असले तरी त्यांचा पाठिंबा घेतल्याने राजकीय नुकसान होण्याच्या भीतीने हे दोन्हीही पक्ष त्यांची मदत घेतील की नाही, यावर शंका आहे. सध्या आमची युती आहे, त्यामुळे आम्हाला आणखी कोणाच्या मदतीची गरज नाही आणि जर युती तुटली तर कोणाची मदत घ्यायची हे नंतर ठरवू, असे भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले. 

एमआयएमची मदत नको 
सत्तागेली तरी चालेल, पण आम्ही अशी अभद्र युती करणार नाही, विकास हा विषय वेगळा आहे, धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांची मदत आम्ही कदापि घेणार नाही. आम्ही विकासासाठी धर्माचा फायदा घेत नाही, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...