आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद- कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तिसगाव शिवारातील शाकुंतल लॉन्सच्या नव्याने सुरू केलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अंदाजे २८ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी दुपारी च्या सुमारास आढळून आला. मृत व्यक्ती नम्रता केटरर्सचा कामगार असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

अधिक माहिती अशी की, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मालकीच्या शाकुंतल लॉन्स, खवड्या डोंगर परिसर तिसगाव येथे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याचा फोन वाळूज एमआयडीसी पोलिसांना लॉन्सच्या मॅनेजरने रविवारी दुपारी केला. पोलिस निरीक्षक नाथा जाधव, फौजदार अमोल देशमुख, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब आंधळे, गोकुळ वाघ, राज सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
 
चार माजली इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर जिन्यालगतच्या मोकळ्या जागेत डोक्यावर पडलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. साधारण पाच ते सहा दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या या व्यक्तीच्या मृतदेहाचा वास सुटल्यामुळे तो बाहेर काढण्यास पोलिसांना कसरत करावी लागली. 
 
पोलिसांचा अंदाज : माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या चिरंजीवांचे लग्न त्यानंतरचा कार्यक्रम सदरील लॉन्स परिसरात २८ फेब्रुवारी रोजी पार पडला. या वेळी नम्रता केटरर्सचे साधारण ४०० ते ५०० कामगार या ठिकाणी काम करत होते. मृत तरुणाच्या पँटच्या खिशातून मिळालेल्या पाकिटाची पोलिसांनी तपासणी केली असता पोलिसांना पाकिटामध्ये युसूफ मोहंमद शेख (२८, रा. पाॅवरलूम कंपनीजवळ, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, चिकलठाणा) असे नाव पत्ता असलेले आधार कार्ड, केटरिंग कार्ड तसेच पासपोर्ट फोटो आढळून आले. 
 
ज्या डकमध्ये मृतदेह आढळून आला, त्यालगत दोन देशी दारूच्या बाटल्यासुद्धा आढळल्या आहेत. त्यामुळे सदरील व्यक्ती नम्रता केटरर्सची कामगार असावी दुसऱ्या मजल्यावर दारू प्यायल्यानंतर खाली येताना जिना स्पष्ट दिसल्यामुळे तसेच डक हा जिन्यालगत असल्यामुळे चुकून कामगार डकमध्ये पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांत करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...