वैजापूर- जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी महिनाभरापासून जिवाचे रान करणाऱ्या इच्छुकांत जोरदार चढाओढ लागली असताना पक्षनेत्यांनी पंचायत समिती गणातून एका उमेदवाराच्या नावाचा अधिकृत बी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे बुधवारी सादर केला होता. मात्र, या उमेदवाराने निवडणुकीत उतरण्यासाठी स्वतःचे नामनिर्देशनपत्रच निवडणूक विभागाकडे दाखल केले नसल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रकियेत ही बाब समोर आली. दरम्यान, या प्रकारामुळे अडचणीच्या फेऱ्यात सापडलेल्या पक्षावर उमेदवारी कापलेल्या इच्छुक कार्यकर्त्याला उमेदवारीचे बाशिंग ऐनवेळी बांधावे लागले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाकडून निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवाराचे बी फॉर्म पक्षनेत्यांनी दाखल केले होते. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी जिल्हा परिषद गटातील आठ व पंचायत समिती गणातील १६ उमेदवारांचे बी फॉर्मचे यादी निवडणूक निर्णय अधिकऱ्याकडे सादर केली होती. या यादीत सवंदगाव पंचायत समिती गणातून प्रतापसिंह मेहेर यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला होता. दरम्यान, छाननी प्रक्रियेदरम्यान त्यांनी पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचे समोर आले. त्यामुळे पक्षाने उमेदवारीच्या शर्यतीतून बाजूला करण्यात आलेल्या मच्छिंद्र रिठे यांना उमेदवारी देण्यात आली.
मनसेतून भाजपत आले होते मेहर
पंधरा दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलेल्या प्रतापसिंह मेहर यांची भाजपने गणासाठी अधिकृत उमेदवारीही जाहीर केली होती.
दरम्यान, ते उमेदवारी अर्ज भरण्यास विसरले की त्यांना निवडणुकीत उतरायचे नव्हते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन अर्जावर नावे
भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मेहर यांनी उमेदवारी अर्ज भरला नसल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे बी फॉर्मवर दुसऱ्या नंबरवर रिठे यांचे नाव टाकलेले होते. तसेच काही जण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गडबड करतील म्हणून फॉर्मवर दोन नावे टाकलेली आहेत.
गट व गणात सहा अर्ज बाद
उमेदवार अर्ज छाननीत जिल्हा परिषद गटात मंगल मोरे शिऊर, मंगल कटारे सवंदगाव गट, पटेल नबी घायगाव गट अशा गटांत तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर गणात सिंगल मन्साराम आसाराम मनूर, अलका लकवाल बोरसर, पोपट पठाडे वांजरगाव यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
छाननीमध्ये अंबेलोहळ गटातील भाजप, सेनेचे उमेदवार बाद
गंगापूर- अंबेलोहळ गटातील भाजपचे अधिकृत उमेदवार व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई व त्याच गटातील शिवसेनेचे उमेदवार अमोल लोहकरे यांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
आज उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन पत्राच्या छाननीमध्ये अंबेलोहळ येथील भाजपचे उमेदवार व विद्यमान जि.प. सदस्य मनोहर गवई व शिवसेनेचे उमेदवार अमोल लोहकरे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत सूचक म्हणून दिलेली व्यक्ती जिल्हा परिषद गटाबाहेरील असल्याच्या कारणावरून दोघांचेही उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले असल्याने दोन्ही पक्षांसमोर निवडणुकीच्या सुरूवातीलाच मोठा पेच उभा राहिला आहे.