आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: क्रांतीचौक-रेल्वेस्टेशन रस्त्यावर भरधाव कार उलटली, अठरा वर्षीय युवक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्रांतीचौक-रेल्वेस्टेशन रस्त्यावर मंगळवारी सकाळी भरधाव इनोव्हा कार उलटली. यात अठरा वर्षीय युवक जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुले गाडी चालवत होती. परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख शफिक नामक युवक गाडी चालवत होता. या अपघातात जखमी झालेल्या रविराज रामराव जाधव (१८, रा. जाफराबाद, जि. जालना ) याने तक्रार देण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

क्रांती चौकापासून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास हा अपघात झाला. इनोव्हा कार (एमएच १५ ईपी ५५५५) भरधाव होती. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पायी जाणाऱ्या रविराज जाधव याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. जाधव जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

वेदांतनगर पोलिस चौकीमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली. अपघातग्रस्त कार निफाड येथील नितीन कदम यांच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

शाळकरी मुले गाडी चालवत होती
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इनोव्हा कार शाळकरी मुले चालवत होती. अपघातानंतर गाडीतील मुलांना तत्काळ बाजूला करून घटनास्थळावरून पाठवून दिले. यात गाडीतील एक मुलगाही जखमी झाला. पोलिस येण्याच्या आतच काही जणांनी क्रेन बोलावून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी गाडी क्रांती चौक पोलिस ठाण्यात जमा केली. 
बातम्या आणखी आहेत...