औरंगाबाद - वाहतूक नियम मोडल्यानंतर वाहनचालकांना दंडाची रक्कम मागताच नेहमी होणारे वाद, पैसे खाल्ल्याचे होणारे आरोप यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण हाेते. यावर उपाय म्हणून औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलिस ई-चालान मशीनद्वारे दंडाची पावती देऊन कॅशलेस कारवाई करणार आहेत.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, ग्रामीण पोलिस अधीक्षक डाॅ. आरती सिंह यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग ग्रामीण भागात राबवण्यात येणार आहे. एका खासगी कंपनीकडून या ई-चालान मशीन मागवण्यात आल्या आहेत. मंगळवार बुधवारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल.
असे आहे ई-चालान मशीन
- मोबाइलपेक्षा थोड्या मोठ्या आकाराची ही मशीन असणार आहे.
- त्यात वाहनचालक, वाहन क्रमांक वाहन परवान्याचे छायाचित्र काढता येईल.
- वाहन परवाना स्कॅन केल्यानंतर मशीनमध्ये त्याने माेडलेल्या नियमाची निवड करावी लागेल. त्यानंतर पावती दिली जाईल तसेच मोबाइलवर मोडलेल्या नियमाची दंडाची माहिती मेसेजद्वारे जाईल.
कारवाई सुलभ होईल
कॅशलेस व्यवहारासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. अनेकदा पोलिसांवर पैसे घेतल्याचे आरोप होतात. त्यामुळे -चालान मशीनद्वारे कारवाईमुळे वाहतूक कारवाई सुलभ सोपी होईल.
-डॉ.आरती सिंह, पोलिस अधीक्षक.