आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीचे टेंडर निघाले, दोन कोटी रुपये खर्चून ३० चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या ३० चौकांत ५० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात या उपक्रमासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहर सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही हा महत्त्वाचा भाग बनू शकतो हे "दिव्य मराठी'ने वारंवार प्रसिद्ध केले आहे. त्यासाठी स्वतंत्र अभियानही राबवले जात आहे. या अभियानांतर्गत शहरातील २०० मंिदरांत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

शुक्रवारी मुंबईतील हनीवेल कंपनीने महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस आयुक्तांना सीसीटीव्हीचे प्रात्यक्षिक दाखवले. शहरातील अमरप्रीत चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून महसूल प्रबोधिनीच्या सभागृहातील तात्पुरत्या नियंत्रण कक्षाद्वारे चौकातील सर्व चित्रीकरणांवर नजर ठेवण्यात आली. या वेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि मनपा आयुक्त डॉ. प्रकाश महाजन, शहर अभियंता सखाराम पानझडे, एम. डी. काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल
तत्कालीन पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पालकमंत्री यांच्या बैठकीत जानेवारी २०१५ मध्ये 'सुरक्षित औरंगाबाद' आणि स्मार्ट सिटी ही संकल्पना मांडण्यात आली होती. असाच प्रयोग याआधी नांदेड शहरात राबवण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने इच्छुक संस्थांकडून टेंडरही मागवले होते. क्रिस्टल आणि हनीवेल या दोन कंपन्यांनी टेंडर भरले होते. त्यात हनीवेल कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. मनपाच्या दोन कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार हे टेंडर शुक्रवारी ओपन करण्यात आले.

डेमोनंतर टेंडर प्रक्रिया राबवली
टेंडर प्रक्रिया राबवण्यापूर्वी अमरप्रीत चौकात दोन्ही कंपन्यांकडून दोन-दोन कॅमेरे लावून डेमो घेण्यात आला होता. दुपारपासून दोन्ही आयुक्तांनी एक-दोन तास पाहणी करून कंट्रोल रूमबाबत माहिती घेतली. या प्रक्रियेनंतर टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. या दोन्ही कंपन्यांच्या वतीने तात्पुरती कंट्रोल रूम महसूल प्रबोधिनीमध्ये तयार करण्यात आली होते.

मुख्य कंट्रोल रूम आयुक्तालयात
डेमोसाठी तात्पुरती कंट्रोल रूम महसूल प्रबोधिनीत ठेवण्यात आली होती. मात्र, कॅमेरे बसवल्यानंतर मुख्य कंट्रोल रूम पोलिस आयुक्तालयात असेल. कॅमेऱ्यांसह सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिस यंत्रणेकडूनच केले जाणार आहे. सिटी चौक, क्रांती चौक, गारखेडा, महावीर चौक, एपीआय कॉर्नर, लेबर कॉलनी, मिल कॉर्नर आदी ३० प्रमुख चौकांत हे सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.