आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडवंचीत द्राक्षबागांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, द्राक्ष शेतीत मोठी झेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - हवामान आणि विविध राेगांपासून संरक्षण व काळजी घेतल्यानंतर काढणीला आलेली द्राक्षे चोरीला जाण्याची भीती असते. त्यासाठी अनेक शेतकरी शेतावरच मुक्काम ठोकतात. मात्र त्यातूनही चोरी होतेच. हे प्रकार पूर्णपणे रोखण्यासाठी जालना तालुक्यातील कडवंची येथील शेतकऱ्याने द्राक्ष शेतीत चक्क सीसीटीव्ही बसवले आहेत. या तंत्रज्ञानाचा उपयोग लक्षात घेऊन त्यापुढे जात त्यांनी आता वायरलेस कॅमेऱ्यांची ट्रायल सुरू केली आहे.  इतर शेतकरीही आता सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढे येत आहेत.  

मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष शेतीत नवे प्रयोग केले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व शास्त्रीय पद्धतीने द्राक्ष शेती केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यातच जालना तालुक्यातील कडवंची या गावाने राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे. येथील अनेक शेतकरी एकरी चार ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे कडवंची या गावातील साडेतीन हजार एकर क्षेत्रापैकी बाराशे एकर क्षेत्रावर द्राक्षबागांची लागवड झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून द्राक्षबागांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुढे येतो आहे. यात काढणीला आलेले द्राक्ष चोरून नेण्याचे लहान-मोठे प्रकार घडत असतात. मात्र काही दिवसांपूर्वीच कडवंचीपासून जवळच असलेल्या वरूड गावातील बबन म्हस्के या शेतकऱ्याच्या २५० द्राक्षवेली अज्ञात व्यक्तीने कापून टाकल्या. उत्पन्न हातात येण्याची वेळ आली असतानाच द्राक्षबाग कापून टाकल्याने म्हस्के यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेपासून धडा घेत हा प्रयोग राबवून शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण केले अाहे.
 
कशामुळे वाढले क्षेत्र ? 
ग्रेप्स हब म्हणून ओळख असलेल्या या गावांमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे. मात्र, शेततळ्याच्या माध्यमातून त्यांनी द्राक्ष शेती करण्यास सुरुवात केली. ठिबक सिंचनाचा वापर करून अगदी कमी पाण्यावरही द्राक्ष शेती करता येते हे लक्षात आल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत द्राक्ष शेतीला प्राधान्य दिले आहे. 
 
आता वायरलेस कॅमेरा
- आमच्याकडे २० एकरवर द्राक्षबाग आहे. आतापर्यंत चोरीचा प्रकार झालेला नाही. मात्र शेतमाल चोरीच्या घटना ऐकून खबरदारी म्हणून आम्ही चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वायरलेस कॅमेऱ्यांची ट्रायल घेतो आहोत. 
प्रभाकर क्षीरसागर, द्राक्षबागायतदार, कडवंची
 
राजकीय वादाचाही फटका  
कडवंची आणि द्राक्ष उत्पादन करणारी परिसरातील अनेक गावे पक्क्या डांबरी रस्त्यांनी जोडली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बागांमध्ये चोरी हाेण्याची शक्यता असते. त्यासाठी कुंपण घातले जाते, मात्र राजकीय व इतर वादातून अपप्रवृत्तीचे लोक आणि समाजकंटक बागेचे नुकसान करू या शक्यतेने हा प्रयोग राबवत आहेत.
 
द्राक्ष शेतीत मोठी झेप 
कडवंची गावाने द्राक्ष शेतीत मोठी झेप घेतली. त्यातून गावाचे अर्थकारण बदलले. त्यापाठोपाठ परिसरातील दहा गावांमध्ये द्राक्षबागांचे क्षेत्र वाढले आहे. यात नंदापूर, पीरकल्याण, धारकल्याण, नाव्हा, बाेरखेडी, वरूड या गावांनीही आपली ओळख निर्माण 
केली आहे. या परिसरातील जवळपास अडीच हजार एकर क्षेत्रावर आता द्राक्षबागा बहरल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...