आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा टाकणारे भरणार सीसीटीव्हीच्या नजरेत, नागरिकांनी पुढाकार घेण्याचे मनपाचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर क्लीन आणि ग्रीन झाल्याशिवाय स्मार्टही होणार नाही. त्यामुळे महापालिकेने नववर्षात “क्लीन सिटी’चा ध्यास घेतला असून त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपाययोजनाही केल्या जाणार आहेत. नागरिकांकडून घंटागाड्यांमध्ये कचरा टाकता तो वारंवार रस्त्यावर किंवा गल्ल्यांतील एखाद्या कोपऱ्यावर नियमितपणे टाकण्याचे काम केले जाते. मनपा कर्मचाऱ्यांनी हे कचऱ्याचे ढिगारे उचलताच ते पुन्हा तयार होतात. ही कटकट कायमची मिटवण्यासाठी मनपाकडून अशा अघोषित डंपिंग ग्राउंडवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी बारुदगर नाला आणि त्रिमूर्ती चौकात कॅमेरे बसवले जाणार असून पुढील दोन महिन्यांत आवश्यक त्या ठिकाणी बसवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
शहराला स्वच्छ भारत अभियानात टॉप टेनमध्ये आणण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शहरातील ज्या वॉर्डात हायड्रोलिक रिक्षा नव्हत्या अशा वॉर्डांना नवीन ५१ रिक्षा देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ३० सफाई कर्मचाऱ्यांना वसुलीच्या कामाला लावले होते त्यांना पुन्हा सफाई कामासाठी नियुक्त केले आहे. नागरिक रस्त्यावरच कचरा टाकून अनधिकृत कचरा डेपो तयार करत आहेत. कचरा टाकणाऱ्यांना दंडही करण्यात आला. मात्र, देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा कचरा टाकण्यात येऊ लागला. ३०० पेक्षा जास्त महिला आणि पुरुषांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यापुढे कचरा टाकणारा नेमका कोण हे ओळखणे सोपे व्हावे, तसेच कचरा टाकण्यापासून त्यांना परावृत्त करावे, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची युक्ती मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अमलात आणण्याचे ठरवले आहे. हा सीसीटीव्हीचा पर्याय गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राज वानखेडे यांनी सुचवला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. यात सुरुवातीलाच बारुदगर नाला आणि त्रिमूर्ती चौकाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने तेथे प्राधान्याने कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. 

शहरात अशा प्रकारे अनेक अघोषित डंपिंग ग्राउंड तयार झाले आहेत. 

गुन्हेगारीलाही आळा बसेल 
- माझ्या वॉर्डातवर्षभरात तीन खून झाले आहेत. मात्र मारेकऱ्यांची ओळख पटली नाही. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास गुन्हेगारीवरही नियंत्रण मिळवता येईल.
शेखजफर बिल्डर, नगरसेवक 

रस्त्यावरील मलबाही काढा 
-अनेक नागरिक बांधकाम झाल्यावर उरलेला मलबा उचलत नाहीत. त्यामुळे रस्ते घाण होतात. त्यांना दंड लावल्यास घाण कमी प्रमाणात दिसेल.
नासेरसिद्दिकी,नगरसेवक, एमआयएम 
 
महिन्यात लावणार कॅमेरे 
- शहर स्वच्छतेसाठीमनपा पूर्ण प्रयत्न करत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे याच महिन्यात लावले जातील.
ओमप्रकाशबकोरिया, आयुक्त 

नागरिकांनीच पुढाकार घ्यावा 
- मनपाकडून नियमितस्वच्छता केली जाते. मात्र त्यानंतरही कचरा टाकला जातो. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा.
अय्युबखान, घनकचरा प्रमुख 

नियोजन सुरू 
शनिवारीकॅमेरे बसवण्यासंदर्भात बकोरिया यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यात स्थळ निवडण्यासह कोणत्या फंडातून कॅमेरे बसवायचे यावर चर्चा झाली. मनपाच्या निधीतून कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मनपा फंडातून कॅमेरे खरेदी 
स्वेच्छा निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता. मात्र या निधीतून हे काम करणे शक्य नसल्याने मनपाच्या फंडातून कॅमेरे लावण्यात येणार आहेत. स्वेच्छा निधीतून डस्ट बिन देणे शक्य असल्याने नगरसेवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 
 
दंड वसुलीदरम्यान वाद : मनपा कर्मचाऱ्यांच्या समोर महिला कचरा टाकतात. त्यांना दंड लावताना त्या कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. काही महिला तर मी कचरा टाकलाच नाही, अशी उलट भूमिका घेतात. अशा वेळी त्यांना दंड करणे अवघड होते. सीसीटीव्हीमुळे मनपाकडे पुरावा राहणार आहे. याशिवाय काही दिवस दोन फिरते पथक ठेवून त्यात महिला पोलिस मनपा कर्मचारी ठेवल्यास कचरा टाकणाऱ्यांवर चांगली जरब बसू शकते, असाही मतप्रवाह आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...