आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कदम + खैरे =३६ आकडा कायम, कदम म्हणाले, आम्ही एकाच गटाचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यासाठी युवा सेनेचे आदित्य ठाकरे शनिवारी शहरात येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाही पालकमंत्री रामदास कदम उपनेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात ३६ चा आकडा असल्याचे समोर आले. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनाच्या बैठकीकडे खैरे फिरकले नाहीत. याचाच धागा पकडत कदम यांनी या वेळी बोलताना आपल्यात गट-तट वगैरे काहीही नाही, आपण फक्त साहेबांचे सैनिक आहोत, असे सांगून वादाला वाट मोकळी करून दिली.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शहानूरमियां दर्गा येथील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीची जबाबदारी आधीपासूनच जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आल्याने खैरे या कार्यक्रमापासून दूर होते. एवढेच नव्हे, तर नेमके काय चालले, याचीही कल्पना त्यांना नव्हती; परंतु आदित्य ठाकरे येणार असल्याने ते किमान तयारीची पाहणी करण्यासाठी येतील, अशी अपेक्षा होती. त्यासाठी पालकमंत्री कदम एक दिवस उशिरा, पण शुक्रवारी शहरात दाखल झाले. सायंकाळी त्यांनी नियोजित कार्यक्रमस्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा खैरे तेथे नव्हते. दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, काही उपशहरप्रमुख अशी मोजकीच मंडळी येथे हजर होती. काही मोजके खैरे समर्थकही तेथे दिसल्याने कदम यांनी गटातटाचा विषय काढला. कदम म्हणाले, हा कार्यक्रम शिवसेनेचा आहे, येथे गट-तट काहीही नाही, आपण सर्व जण साहेबांचेच सैनिक आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांकडेही फिरकले नाहीत खैरे
दरम्यान,पालकमंत्री शहरात आल्यानंतर खा. खैरे त्यांच्यासोबत बैठक घेतील, त्यांची भेट घेतील, किमान माध्यमांसमोर तरी एकत्रित येतील, असे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. सेनेचे कोणी मंत्री किंवा पालकमंत्री शहरात आले आहेत, असे खैरेंनी दाखवलेच नाही. ते त्यांच्या कार्यक्रमांतच व्यग्र होते. पालकमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हाही खैरे तेथे फिरकले नाहीत. शनिवारी सकाळी मात्र ते कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.