आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या बदनामीला शिवसेनेतूनच फूस; काल परवा आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये -खासदार खैरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - शिवसेनेचे आपण स्थापनेपासूनचे शिलेदार असून संघटनेत कालपरवा आलेल्या उपऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना त्यांचे नाव घेता फटकारले. येथील सिडको कार्यालयात आयोजित बैठकीनंतर गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार जाधव यांनी खासदार खैरे यांच्या विकास निधीतून झालेल्या कामांवर जाहीरपणे टीका सुरू केली आहे. 
 
आपल्यासंबंधी विरोधी पक्ष एकही आक्षेप घेत नसताना स्वकीयांनी फूस लावलेले मात्र कोल्हेकुई करतात. आपण आजही मेरिटचे विनिंग कँडिडेट असून सगळा प्रकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितला आहे. मराठवाड्याबाहेरच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर इथले काही पदाधिकारी नाचत असून अशा बाहेरच्यांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याचे ते पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सूचक इशारा करीत म्हणाले. थांबा, वाट पाहा, लवकरच माझ्या बदनामीची मोहीम चालवणारांचा पत्ता कट होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 
खासदार खैरे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा खटाटोप चालवल्याची टीका आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. खासदार खैरे यांनी आमदार फंडातून झालेल्या कामांचा समावेश आपल्या कामात दाखवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आपण उद्धव ठाकरेंपुढे आपले गाऱ्हाणे मांडले असून आपल्याविरोधात कारवाया करणाऱ्यांना बदलले जाणार असल्याचे संकेत मिळाल्याचेही ते म्हणाले.. 

आमदारकी मीच वाचवली 
हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तो स्वीकारणार होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आ. जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, हर्षवर्धन यांच्या पत्नी संजना जाधव यांनी राजीनामा स्वीकारला जाऊ नये, अशी विनंती आपल्याकडे केल्यामुळे आपण हरिभाऊ बागडे यांना भेटून राजीनामा स्वीकारू नये, असे सांगितले. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आपण रोखली, असा दावाही खैरे यांनी केला. मातोश्रीवर आमदार जाधव आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्यात वाद झाला. त्या वेळी या माणसाला कधीच जवळ करणार नाही, असा निर्धार कदम यांनी केला होता. मात्र, आता दोघांनीही आपापसात जुळवून घेऊन आपल्याविरोधी कारवाया सुरू केल्या आहेत, असेही खासदार खैरे पालकमंत्र्यांचे नाव घेता म्हणाले. 

चांडाळ चौकडी कोणाची? : शहरआणि जिल्हा शिवसेनेत काही महिला पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून चांडाळचौकडी माझ्याविरुद्ध कार्यरत आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे ही चौकडी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, एमआयएम, आरपीआय कुणीच माझ्याविरुद्ध बोलत नाहीत. विरोधी पक्षाचे काम शिवसेनेतून काही मंडळी करीत आहेत असे नमूद करीत आज निवडणुका झाल्या तर युती नसली तरी मी स्वबळावर निवडून येऊ शकतो हे सांगायलाही खैरे विसरले नाहीत. आपल्याविरोधातील उमेदवारही मी ठरवू शकतो, असा दावाही त्यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...