आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काल अधिकाऱ्यांना शिव्या घालणारे खैरे आज बॅकफूटवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोणी अधिकारी मंदिर पाडण्यासाठी आले तर त्यांच्यावर दगडफेक करा, अशी भाषा शनिवारी करणारे खासदार चंद्रकांत खैरे रविवारी मात्र बॅकफूटवर आले. माध्यमांशी बोलताना त्यांनी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया हे चांगले अधिकारी आहेत, मात्र मंदिराबरोबरच इतर धार्मिक स्थळेही पाडणे आवश्यक आहे. मात्र, मंदिर आणि मशीद हलवण्याचे काम समन्वयानेच करणे आवश्यक आहे, अशी सामोपचाराची भाषा त्यांनी आज केली.
गेल्या आठ दिवसांपासून राजाबाजार ते बायजीपुरा गंजे शहिदा मशिदीपर्यंतचा रस्ता मोकळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. गुरुवारी रस्ता रुंदीकरणात जिन्सीतील सिद्धेश्वर मंदिर येत असल्याने हे मंदिर काढण्याची सूचना मनपाचे अधिकारी आणि नगरसेवकांनी ट्रस्टींना दिली होती. मात्र आमदार अतुल सावे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी मध्यस्थी केली. ट्रस्टींच्या विनंतीवरून प्रशासनाने मंदिर काढण्याची कारवाई थांबवली होती. शनिवारी दुपारी खैरे यांनी पाहणी करत मंदिर हटवणाऱ्या अधिकाऱ्यांवर दगडफेक करा, अशी चिथावणी बकोरिया यांचे नाव घेता दिली होती. अधिकाऱ्यांना कोंडून ठेवा, असेही ते म्हणाले होते.

हिंदूंच्या रक्षणासाठी तयार : शनिवारच्या वक्तव्याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले असता त्यांनी इतर धार्मिक स्थळे सोडून मंदिर पाडायला येणाऱ्यांना सोडून द्यायचे का? असा उलट सवाल केला. हिंदूच्या रक्षणासाठीच मी कधीही तयार आहे. अधिकाऱ्यांनी अगोदर ट्रस्टींना मारण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. त्यामुळे मला ही भूमिका घ्यावी लागली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. चर्चा करूनच धार्मिक स्थळे हटवणे आवश्यक आहे. प्रेमाने सांगा, बोलवा आम्ही धार्मिक भावना जपून प्रशासनाला मदत करू, असेही ते म्हणाले.

कोणताही राजकीय स्टंट नाही : धार्मिकस्थळांचा विषय असल्याने मी पुढाकार घेतला. मंदिराच्या रक्षणांसाठी तेथे गेलो होतो. यात कोणत्याही प्रकारचा राजकीय स्टंट नसल्याचे खैरे यांनी सांगितले.

बकोरिया चांगले, पण मनमानी करतात
मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया हे चांगले अधिकारी आहेत. मात्र कोणतेही काम करताना ते मनमानी करतात. हे चुकीचे आहे. त्यांनी आम्हाला विचारून केले तर आम्हीही मदत करण्यास तयार होऊ. त्यांनी धार्मिक स्थळांबाबत काही उलटसुलट निर्णय घेतला तर मंदिराचे संरक्षण आम्ही करणारच, असेही खैरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...