आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोसले गढीवर सेना स्टाइलने जयंती करू- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहाजी राजे भोसले यांचा पूर्णाकृती पुतळा येथे आहे. - Divya Marathi
शहाजी राजे भोसले यांचा पूर्णाकृती पुतळा येथे आहे.
वेरूळ - येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीवर १५  मार्च (तिथीप्रमाणे) रोजी शिवजयंती शिवसेना आपल्या स्टाइलने  धूमधडाक्यात साजरी करेल, असे वक्तव्य दैनिक दिव्य मराठीशी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मंगळवारी व्यक्त केले.  १९  फेब्रुवारी रोजी शासनातर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी  तलाठी एन. बी. कुसनुरे, पोलिस पाटील रमेश ढिवरे, माजी सरपंच प्रकाश पाटील, सुधाकर दहिवाळ हे वेरूळ येथील भोसले गढीवर गेले असता गढीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर कुलूप लावल्याचे आढळून आले होते. 
यामुळे या सर्वांना संरक्षक भिंत व संरक्षक भिंतीवरून उडी मारून शिवप्रतिमेचे पूजन करावे लागले होते. यामुळे संबंधित प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून आला होता, तर उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यानेही उपस्थितांना अरेरावीची भाषा वापरल्याने सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात होती. दैनिक दिव्य मराठीनेही २० फेब्रुवारीच्या अंकात भोसले गढीस टाळे; संरक्षक भिंतीवरून उडी मारून दर्शन या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यावर प्रतिक्रिया देत दानवेंनी वक्तव्य केले. 
या वेळी येथे पताका लावण्यासह आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात येईल व याची जबाबदारी माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्याकडे देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोठे दुर्लक्ष
वर्षानुवर्षे स्मारकाकडे दुर्लक्ष करणाऱ्या  बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदान शिवजयंती दिवशी तरी येथे स्वच्छता करून या परिसरात सजावट केलेली असावी, अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. सजावट दूरच परंतू स्वच्छता नाही आणि शिवजयंतीच्या दिवशीही स्मारक सकाळी लवकर उघडलेले नव्हते. यामुळे शिवभक्तांना ताटकळत बसावे लागले. 
 
दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात येईल - डॉ.अरुण जऱ्हाड , तहसीलदार
आजच्या दिवशी घडलेली चुकी ही गंभीर असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, म्हणून संबधित विभागास नोटीस देण्यात येणार असून कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 
 
अधिकारी , कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणे गरजेचे - प्रकाश पाटील, माजी सरपंच
स्मारकाकडे दुर्लक्ष करणारे कर्मचारी , अधिकाऱ्यांनी निदान शिवजयंतीच्या दिवशी तरी दुर्लक्ष करायला नको होते. अशा बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे. 
अधिकाऱयांना तातडीने जाब विचारण्यात येईल - श्रीमंत हारकर, उपविभागीय अधिकारी
आम्ही आज तहसीलदारा मार्फत तातडीने संबधित विभागास पत्र देणार असून सोमवारी संबधित अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून जाब विचारण्यात येईल व त्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. 
 
...आणि राजे पुन्हा आठवले 
आज स्मारकाची चावी नसल्याने भिंत व सुरक्षा जाळी वरून उडी मारताना खरेच राजे आठवल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. राजे ही लढाईसाठी जाताना डोंगर कपारीतूनच जात होते. तेव्हा त्यांना किती कष्ट सोसावे लागले असतील याची कल्पनाही करवत नाही.
- सुधाकर दहिवाळ , शिवसैनिक 
बातम्या आणखी आहेत...