आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन नातेवाइकांचा घाटीत ठिय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटीत नातेवाइकांनी ठिय्या दिला. छाया : माजिद खान - Divya Marathi
घाटीत नातेवाइकांनी ठिय्या दिला. छाया : माजिद खान
औरंगाबाद - घाटनांद्रा येथील जंगलात १५ वर्षीय मुलीचा मृतदेह १५ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास सापडला. रविवारी सकाळी घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. मात्र आरोपींना पोलिस अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेत शवविच्छेदन विभागासमोर ठिय्या मांडला. सीमा रामदास राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून ती दहावीत शिकत होती. 
 
सकाळी आठ वाजेपासूनच हनुमंत खेडा येथील तिच्या नातेवाइकांनी घाटीत गर्दी केली होती. या वेळी गोर सेनेचे रविकांत राठोड, दत्ता राठोड, योगीराज राठोड, संदीप राठोड, राहुल राठोड, विजय चव्हाण, सुनील पवार, संतोष राठोड, योगेश राठोड, किरण राठोड, रतीलाल चव्हाण, शेख फिरोज, विकास जाधव उपस्थित होते. त्यांनी येथे घोषणाबाजी केली. अखेर अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी घाटीत येऊन नातेवाइकांची भेट घेत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन हनुमंतखेडा येथे नेला. 
 
मृत मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा ही १४ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळेतून घरी परतली. त्यानंतर ती लगेच पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली. तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर १५ जुलै रोजी तिच्या कुटुंबीयांनी बनोटी पोलिस ठाणे गाठून ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. घाटनांद्रा येथील जंगलाच्या दरीत शाळेचा गणवेश असलेल्या मुलीचा मृतदेह सापडल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता ती सीमाच असल्याचे समोर आले. 
 
बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप 
बलात्कार करून मुलीचा खून केल्याचा आरोप गोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. मात्र वैद्यकीय अहवाल आल्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होईल, असे उज्ज्वला वनकर यांनी सांगितले. तपास वेगाने सुरू असून काही महत्त्वाचे पुरावेदेखील हाती लागले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनीदेखील घटनास्थळाची पाहणी केल्याचे वनकर म्हणाल्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, पवार यांच्यासह ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...