आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको उड्डाणपुलाची लांबी वाढणार नाहीच, उपअभियंता बर्डे यांचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कोणत्याही परिस्थितीत मे महिन्यापूर्वी सिडको येथील उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी ग्वाही राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी)वतीने शिवसेनेच्या शिष्टमंडळाला गुरुवारीच दिली गेली. तरी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी पुन्हा सिडको उड्डाणपुलाची पाहणी केली.
दरम्यान, सिडकोतील उड्डाणपुलाची लांबी ५०० मीटरने वाढवण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी, अशी सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र, आता पुलाची लांबी वाढणार नाही, नियोजनानुसारच हा पूल होईल, असे उपअभियंता उदय बर्डे यांनी स्पष्ट केले.

शहरातील सिडको तसेच महावीर चौकातील उड्डाणपुलाच्या कामात दिरंगाई होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. मुद्दाम विलंब करण्यात येत असल्याचेही काल सांगण्यात आले होते, परंतु निधीची कमतरता नाही, त्यामुळे वेळेत काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारीच स्पष्ट केले असले तरी दानवे यांनी शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष पुलाच्या कामाची पाहणी केली. या वेळी बर्डे यांनी पुन्हा तेच आश्वासन दिले. शहरप्रमुख बाळासाहेब थोरात संतोष जेजूरकर, राजू वरकड, माजी सभागृह नेते सुशील खेडकर, दिलीप हेगडे, चंद्रकांत पिंगळे, माजी नगरसेवक दिग्विजय शेरखाने, मनोज गांगवे, कमलाकर जगताप, राजेंद्र राठोड, शाहुराज चिकटे आदी या वेळी उपस्थित होते.

पूल नियोजनानुसारच
भाजपच्याएका गटाने या पुलाची लांबी पश्चिमेकडे वाढवावी, कारण रामगिरी चौकातील सिग्नलजवळच हा पूल खाली उतरत असल्याने येथे वाहतूक कोंडी होणार असल्याचे म्हटले होते. यासाठी शासन दरबारी या मंडळींनी जोरही लावला. परंतु उपयोग झाला नाही. हा पूल नियोजनानुसारच होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कालचेच आश्वासन अधिकाऱ्यांनी आज पुन्हा शिवसैनिकांना दिले.