आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चतुर्थश्रेणी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या, औरंगाबाद परिक्षेत्रातील कर्मचारी वाऱ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाअंतर्गत असलेल्या १३ युनिटमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. तृतीय श्रेणीमधील रिक्त असलेल्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भराव्यात, असा शासन निर्णय अाहे. राज्यातील औरंगाबाद वगळता इतर परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या मिळालेल्या आहेत. फक्त, औरंगाबाद परिक्षेत्रातील पोलिस कर्मचाऱ्यांनाच हा पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही. 
 
चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हतेच्या आधारे वर्ग तीनमध्ये पदोन्नती द्यावी, वर्ग तीनमधील रिक्त असलेल्या २५ टक्के जागा अशा पद्धतीने पदोन्नतीद्वारेच भराव्यात, असा १० मे २०१५ रोजीचा शासन निर्णय होता. विविध कर्मचारी संघटनांच्या मागण्यांनंतर १४ जानेवारी २०१६ रोजी २५ टक्क्यांऐवजी ५० टक्के जागा पदोन्नतीने भरण्याचा शासन निर्णय झाला. 

दरम्यान, या शासन निर्णयाच्या आधारे आतापर्यंत राज्यभरातील इतर वेगवेगळ्या परिमंडळांमधून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग तीनच्या श्रेणीमध्ये पदोन्नती देण्यात आल्या. सध्या औरंगाबादचे पोलिस आयुक्त असलेले अमितेशकुमार हे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक होते. त्या वेळी त्यांनी २१ फेब्रुवारी २०१५ रोजी पदोन्नतीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश सर्व पोलिस अधीक्षक, समादेशक पोलिस प्रशिक्षण केंद्रांच्या प्राचार्यांना दिले होते. मात्र, त्यांची बदली झाली आणि तो आदेश धूळखात पडला. त्यानंतर विश्वास नांगरे-पाटील यांनीही १६ मे २०१५ रोजी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, वर्ग तीनमधील रिक्त असलेल्या जागांचा तपशील मागवला होता; परंतु पुढे काहीच झाले नाही. 

लवकरच निर्णय घेऊ 
शासन निर्णयपाहूनच आम्ही पदोन्नतीबाबत निर्णय घेऊ. लवकरच सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची माहिती मागणार आहोत. सेवा ज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हतेच्या आधारावर नियमानुसार या वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
-अजित पाटील, विशेषपोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र 

अनेक वर्षांपासून प्रतीक्षा 
राज्यातील इतरपरिक्षेत्रांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग तीनमध्ये पदोन्नत्या मिळाल्या आहेत. औरंगाबाद परिक्षेत्रातील कर्मचारीही अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहोत. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी आम्हाला न्याय द्यावा. -पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले कर्मचारी 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)