आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूल खचल्याचे खापर महावितरणवर, जिल्हाधिका-यांनी ठेवला ठपका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवरील बेसुमार वाळू उपशामुळे खचललेल्या पुलाचे खापर बीडच्या जिल्हाधिका-यांनी वीज वितरण कंपनीवर फोडले आहे. वीज खात्यानेे नदी पात्राजवळ अवैध कनेक्शन दिले नसते तर वाळू उपसा झाला नसता आणि पूल खचला नसता, याप्रकरणात वीज अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पैठण उपविभागाने २००२ मध्ये पुलाचे काम पुण्याच्या मनोज स्थापत्य कंपनीस दिले होते. सबमर्सिबल तंत्रज्ञान म्हणजे जेवढी पुलाची उंची तेवढीच खोली भूगर्भात घेऊन खालपासून दगडी बांधकाम करुने ४० मीटर लांबीचा पाण्यावर तरंगणारा पूल तयार करण्यात आला. पूल निर्मितीनंतर २००४ आणि २००६ मध्ये दीड आणि अडीच लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्या वेळीही या पुलावरून वाहतूक सुरळीत होती. पण दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणातून हिरडपुरी बंधा-यासाठी अडीच हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. या किरकोळ प्रवाहात हा पूल खचला.
एकदिवस आधी २०० ट्रॅक्टर वाळू उपसा
गेवराईत कुरणपिंप्री जवळील गोदापात्रातील अवैध वाळू उपशाची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे केली होती. त्यांनी एक पथक घटनास्थळी पाठवले. त्याच रात्री सुमारे २०० ट्रॅक्टर वाळू उपसा करून जवळच्या मैदानात टाकण्यात आला. तहसीलदारांनी त्याचदिवशी वाळू उपसा करणा-या पटेल पितापुत्रांना रोखले असते तर ही घटना घडली नसती असे ग्रामस्थ शेख रफीक शहाबुद्दीन म्हणाले.
तहसीलदारांना वाळूसाठा दिसला नाही
कुरणपिंप्री गावालगत खुल्या मैदानात जवळपास १०० ब्रास अवैध वाळूसाठ्याचे ढिगार आहेत. मात्र, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना ते दिसले नाही. या साठ्यासंदर्भात त्यांना विचारले असता, बेकायदा वाळू उपसा करणा-या पटेल पितापुत्रांविरुद्ध दंडात्मक कारवाई करू. बेकायदा वाळू उपसा करण्यास मदत करणा-यांची गय केली जाणार नाही असे ते म्हणाले.
दोष वीज अधिका-यांचाच
तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यावर कारवाई करणार करणार का, या प्रश्नावर जिल्हाधिकारी म्हणाले, पात्रालगत नियमबाह्य वीज कनेक्शन दिल्यानेच ही घटना घडली. त्याचा २ दिवसांत अहवाल येईल. त्यानंतर लाइनमन, उपअभियंता व त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांवर कारवाई करू. आमच्या अधिका-यांचा प्रकरणात काही संबंध येत नाही असे मला वाटते.
आमदारांकडून चौकशीची मागणी
‘अवैध वाळू उपशा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. संबंधितांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. दिला आहे. केवळ वाळूउपशामुळेच ही घटना घडली असून अजून ५० वर्षे हा पूल उभा राहिला असता’ लक्ष्मण पवार, आमदार, गेवराई.