आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- मनपा आयुक्त दीपक मुगळीकर प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होत असताना शनिवारी सकाळी १५ डिसेंबरपर्यंत या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्वीकारला तो जिल्हाधिकारी कचेरीत. यासाठी ते मनपा मुख्यालयात आले नाहीत. विशेष म्हणजे दिवसभरातही ते मनपाकडे फिरकले नाहीत. पहिल्याच दिवसाच्या त्यांच्या या कृतीवरून ते मनपाला फारसा वेळ देणार नाहीत हे स्पष्ट होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शनिवारी राम यांनी पदभार स्वीकारला खरा, परंतु सोमवारपासून ते सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे संचिकांवर आयुक्तांची स्वाक्षरी घेण्यासाठी नजर ठेवून बसलेल्या नगरसेवकांना ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली. मुगळीकरांच्या अनुपस्थितीत राम हे महापालिकेचा गाडा हाकतील, असे शासनाने शुक्रवारी पत्राद्वारे स्पष्ट केले होते. ते सकाळी कार्यालयात येऊन पदभार स्वीकारतील, असे सर्वांना अपेक्षित होते. परंतु त्यांनी मनपा अधिकाऱ्यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेत तेथेच पदभार स्वीकारण्याचे सोपस्कार पूर्ण केले. अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नगरसेवक अस्वस्थ
मुगळीकर यांनी ५०० संचिका स्वाक्षऱ्यांशिवाय परत पाठवून दिल्या. त्यामुळे नगरसेवकांची कामे थांबली आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी राम मनपात आले तर त्यांच्याकडून काही संचिकांवर सह्या घेता येतील, अशी नगरसेवकांची अटकळ होती. परंतु ते काही आले नाहीत.
येथे जास्तीचा वेळ देणार नाही, असे संकेत दिल्याने नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. कारण गत आठवड्यातच अंदाजपत्रक हाती लागले. अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली आणि त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी घेण्याच्या प्रयत्नात असताना मुगळीकर प्रशिक्षणाला गेले. राम सह्या करणार नाहीत. तेव्हा १५ डिसेंबरपर्यंत हातावर हात ठेवून बसावे लागते की काय, असा प्रश्न काही नगरसेवकांना पडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.