आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादांनी गाजला मुंढे यांचा कार्यकाळ- साखर कारखानदारी आणि टॅँकर लॉबीला दिला दणका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची बुधवारी बदली झाली. त्यांची सोलापुरातील १७ महिन्यांची कारकीर्द अनेक वादांनी गाजली. त्यांना चांगलेच खट्टे-मिठे अनुभव आले. पालकमंत्र्यांशी ताणलेले संबंध आणि पोलिस आयुक्तांशी झालेला अधिकार क्षेत्रावरून वादही गाजला.
सिद्धरामेश्वर यात्रेचे आप्तकालीन नियोजन, ताडीचा लिलाव आदी मुद्द्यांवर वाद झाले. त्यावरून प्रशासनाविरुद्ध आंदोलनेही झाली. सरकारी जमिनी घेतलेल्यांनी शर्तभंग केल्याची प्रकरणे, सरकारी बँक, महामंडळे यांची थकबाकी वसुली मोहीम, वाळू लिलावातून महसूल वाढ, जलयुक्त शिवार मोहीम, पंढरपूर आषाढी यात्रेचे नियोजन याविषयी कौतुकही झाले. मात्र, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर ताणलेले संबंध शेवटपर्यंत मधुर झाले नाहीत. सिद्धेश्वर यात्रा नियोजनाच्या वादातच पोलिस आयुक्तांशी झालेला अधिकार क्षेत्रावरून पत्रव्यवहारही गाजला.

मुंढे यांनी १७ नोव्हेंबर २०१४ रोजी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे ताब्यात घेतली. प्रशासनालाच शिस्त लावली नाही तर संपूर्ण जिल्ह्याला शिस्त लावली. मुंढे यांनी दुष्काळ स्थितीत टंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये टँकरऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यावर भर दिला. नियमावर बोट ठेवत कामकाज केले असले तरी शासनाचा निधी योग्य ठिकाणी योग्य कामांवरच खर्च व्हावा, यासाठी प्रयत्न केले.

मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्या विरोधातील वाद याची अधिक चर्चा झाली. याशिवाय होम मैदानावरील आपत्कालीन रस्ता हा विषय उच्च न्यायालय मुख्यमंत्री यांच्यापर्यंत गेला. जिल्हाधिकारी मुंढे यांनी सुरुवातीपासूनच कार्यालय तपासणी, प्रलंबित प्रकरणे कामचुकार अधिकारी यावर अधिक लक्ष केंद्रित केले. मंद्रूप येथील निकृष्ट बंधाराप्रकरणी थेट कार्यकारी अभियंता एन. आर. कारीमुंगी यांना निलंबित करण्याची कारवाई मुंढे यांनी केली.

१७ महिन्यांत घेतल्या ५०० पेक्षा अधिक बैठका
दरमहाकार्यक्रमांचे नियोजनच करत होते. १७ महिन्यांत सर्व विभागांच्या ५०० पेक्षा अधिक बैठका घेतल्या. विशेष म्हणजे दर सोमवारी विभाग प्रमुखांची आढावा बैठक तर लोकशाही दिन वेळी जिल्ह्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेत. फक्त रजा घेतल्या. उत्कृष्ट कामाबद्दल एकाच वर्षात त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते तीनवेळा गौरव करण्यात आला. आयुक्त रजेवर गेल्यानंतर दिवसांसाठी जिल्हाधिकारी मुंढे यांच्याकडे महापालिकेचा पदभार आला. शहारात सहा दिवसांवरून चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. थकीत कर वसुलीसंबंधी धडक मोहीम राबवली.

जिल्हा प्रशासन तणावमुक्त
जिल्हाधिकारीमुंढे यांच्या बदलीची जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा होती. महसूलसह सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील तणाव दूर झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. शिवाय जिल्हाधिकारी मुंढे आज बैठकीसाठी मुंबईत असल्याने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.