जालना - जालना जिल्हा परिषदेची सत्ता युतीच्याच ताब्यात ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मात्र जुळवून घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी त्यांची अधिकृत बैठक झाली नसली तरी १८ जानेवारीनंतर बैठक हाेण्याची शक्यता आहे.
पालिका निवडणुकीत भाजपने चारपैकी एक पालिका ताब्यात घेण्यात यश मिळवले, शिवाय पक्षाच्या जागाही वाढल्या. जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री राजेश टोपे यांनी तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांत सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी मोठी आंदोलनेही केली. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी १६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. आता त्यापेक्षा चांगले यश मिळेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करत आहेत.
गेल्या निवडणुकीत केवळ ३ जागा जिंकलेल्या काँग्रेसने नुकतेच पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले. परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद, तर भोकरदनचे राजाभाऊ देशमुख यांच्याकडे जिल्हा कार्याध्यक्षपद सोपवले. जेथलिया यांनी परतूर पालिका ताब्यात घेतली, भोकरदन पालिकेत राजाभाऊ यांनी यश मिळवले, तर जालना पालिकेत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने यश मिळवले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा केला जातो आहे. त्यातच दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी जुळवून घेण्याची तयारी दर्शवल्याने आघाडी निश्चित मानली जात आहे . जिथे ज्यांची खरोखर ताकद आहे तिथे त्या पक्षाचा उमेदवार, असे सूत्र घेऊन इलेक्टिव्ह मेरिटवर आघाडीचे जागावाटप होईल.
विकासकामांच्या श्रेयवादावरून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. जिल्ह्यातील या प्रमुख नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने युतीच्या निर्णयाबाबत शंका उपस्थित हाेत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि खोतकर यांच्यात एक बैठक झाली. यात शिवसेनेने जागावाटपाचा गेल्यावर्षीचा फॉर्म्युला कायम ठेवावा, असा प्रस्ताव दिला. भाजपने मात्र जिल्ह्यात आपली ताकद वाढली असल्याचे सांगत वाढीव जागांची मागणी केली. युतीच्या पहिल्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. दानवे-खोतकर यांच्या एकत्रित बैठकीतच यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो. मात्र, सध्या तरी दोघांच्या एकत्रित बैठकीची शक्यता धूसर झाली आहे.
अर्जुन खोतकर-लोणीकर यांच्यात जवळीक वाढली
खोतकर-दानवे यांच्या २५ वर्षांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला असताना दुसरीकडे खोतकर-लोणीकर या शिवसेना-भाजपच्या मंत्र्यांची जवळीक वाढली आहे. युतीसंदर्भातही या दोघांत एक बैठक झाली. शिवाय सिमेंट रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी खोतकर यांनी खासदार रावसाहेब दानवे यांना निमंत्रित न करता लोणीकर यांना प्रमुख निमंत्रण दिले होते.