आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षभरापासून बंद सोसायटीत पंधरा दिवसांत ३० लाख जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे काही क्षेत्रांना फटका बसल्याची ओरड होत असली तरी बंद पडण्याच्या मार्गावर असणाऱ्या सातारा विविध सहकारी सोसायटीला मात्र या निर्णयाचा लाभ झाला आहे. पीक कर्जाची रक्कम १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांद्वारे स्वीकारण्याच्या निर्णयामुळे सोसायटीत अवघ्या १५ दिवसांत ३० लाख रुपये जमा झाले आहेत.
सातारा गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले होते. कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकरी तयार होते. मात्र सेंट्रल बँकेच्या आदेशानुसार सोसायटीने १२ टक्केप्रमाणेच कर्जाचा भरणा करावा यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरता आले नाही. त्यामुळे या वर्षी कर्जाचे वितरणही करण्यात आले नाही. त्यामुळे सोसायटीकडे कुणीच फिरकत नव्हते. सोसायटी बंद झाल्यात जमा होती. मात्र शासनाने नोटाबंदीचे आदेश दिल्यानंतर सोसायटीने जुन्या चलनी नोटांनी कर्ज स्वीकारण्याची तयारी दर्शवली. विशेष म्हणजे कर्ज भरण्यासाठी सात टक्के व्याजदाराने कर्ज भरण्यास मंजुरी देण्यात आल्याने नागरिकांनी त्वरेने कर्जाची परतफेडही केली.

वर्षभर सुरू होता वाद
शासनाने आदेश देऊन सात टक्केप्रमाणे व्याज भरण्याचे स्पष्ट केलेे आहे. मात्र, सेंट्रल बँकेच्या आदेशाप्रमाणे १२ टक्केप्रमाणे व्याज वसूल करण्यात येणार असल्याचे सोसायटीने सांगितले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याचे टाळले होते. सोसायटी आणि नागरिकांमध्ये वर्षभर वाद सुरू असल्याने बँकेकडे कुणीच जात नव्हते. मात्र चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा स्वीकारण्यासह सात टक्के व्याजदरानेच कर्ज भरण्यास मुभा दिल्याने नागरिकांनी येथे गर्दी केली.

अनेक शेतकरी वंचित :सेंट्रल बँक आणि सहकारी सोसायटीने सात टक्के व्याजदराने पीक कर्ज वसूल केले असते तर चालू वर्षात अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेणे शक्य झाले असते. त्यासाठी शेतकरी पैसे भरायला तयार होते, परंतु सोसायटी बँक यांच्यातील असमन्वयामुळे चालू वर्षात शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहिले. यंदा एकासही कर्ज देण्यात आले नाही.

^७ टक्के व्याजदराने पैसे स्वीकारण्याचा निर्णय आधीच झाला असता तर सोसायटीला लाभ झाला असता. नोटबंदीनंतरही या नोटा स्वीकारण्यासह टक्क्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनाही कर्ज फेडण्याची सवलत मिळाली. -सोमीनाथ शिराणे, माजी चेअरमन, सहकारी सोसायटी, सातारा
बातम्या आणखी आहेत...