आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश-विदेशात सत्ताबदल, ब्रेक्झिट, नोटाबंदी होऊनही तीन वर्षांत टॅक्स सेव्हिंग फंडांनी दिला माेठा परतावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 औरंगाबाद -  कर बचतीचा उत्तम पर्याय असलेल्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) म्युच्युअल फंडांनी मागील तीन वर्षांत चमकदार कामगिरी करत गुंतवणूकदारांच्या पदरात भरभरून परतावा दिला आहे.
 
देशातील सत्ताबदल, अमेरिकेतील सत्तांतर, ब्रेक्झिट आणि नोटाबंदीसारख्या शेअर बाजारावर परिणाम करणाऱ्या घडामोडी होऊनही ईएलएसएस फंडांनी २५.५० ते ३१.२५ टक्के सरासरी परतावा देत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.  या फंडांकडून चांगले रिटर्न मिळत अाहेत. कर बचतीसह करमुक्त चांगले उत्पन्न मिळत असल्याने गुंतवणूकदार खूश झाले आहेत. 

प्राप्तिकरात कर सवलत देणारे एक साधन म्हणून गुंतवणूकदार ईएलएसएस फंडांत गुंतवणूक करतात. कर बचतीच्या साधनात सर्वांत कमी म्हणजे तीन वर्षे  कुलूपबंद  (लॉक इन) कालावधी म्हणून गुंतवणूकदार ईएलएसएसमधील पध्दतशीर गुंतवणुकीला (एसआयपी) पसंती देतात. ईएलएसएस फंडांनीही गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवणारी कामगिरी मागील तीन वर्षांत केली आहे.
 
सध्याच्या अव्वल परतावा देणाऱ्या पाच ईएलएसएस फंडांनी तर गुंतवणूकदारांना सरासरी २५.५० ते ३१.२५ टक्के निव्वळ परतावा दिला आहे. याच काळात करबचत करणाऱ्या पीपीएफ, कर बचतीच्या मुदत ठेवी (एफडी) आदी साधनांनी ८ ते ८.२ टक्के दरांनी परतावा दिला आहे.
 
एसआयपी फायदेशीर  
- ईएलएसएस तीन वर्षे लॉक इन कालावधी असणारे साधन आहे. प्रत्यक्ष शेअर बाजारात गुंतवणूक न करता चांगला परतावा देण्यात ईएलएसएसला पर्याय नाही. या फंडातील दरमहा पध्दतशीर गुंतवणूक (एसआयपी) नेहमीच फायदेशीर ठरलेली आहे. 
विश्वनाथ बोदडे, गुंतवणूक सल्लागार, नाशिक
- माझ्याकडील सर्वच ग्राहकांना ईएलएसएस एसआयपीचा चांगला परतावा मागील तीन वर्षांत मिळाला आहे. बाजारातील तेजीचा सर्व लाभ या फंडांनी दिला आहे.  
लक्ष्मीकांत कोरडे,  असोसिएट फायनान्सिअल प्लॅनर,औरंगाबाद
 
सोने, सेन्सेक्स  पेक्षा जास्त रिटर्न 
मागील तीन वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास सोने आणि सेन्सेक्स मधील गुंतवणुकीपेक्षा ईएलएसएस फंडांनी चांगला परतावा दिला आहे. सेन्सेक्सच्या तुलनेत ईएलएसएस फंडांनी नोव्हेंबर २०१५ ते नोव्हेंबर २०१६ या वर्षभराच्या काळात ६.८२ टक्के अधिक दराने जास्त परतावा दिला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...