औरंगाबाद - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सहायक प्राध्यापक पदासाठीच्या राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेचे (सेट) संकेतस्थळ मंगळवारी क्रॅश झाले. १० जानेवारी हा या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर गर्दी केल्याने अशी स्थिती उद््भवली. त्यामुळे परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी विद्यापीठ प्रशासनाने अर्ज करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. १६ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी या ठिकाणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०१७ होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने यास २० जानेवारी २०१७ रोजी ६ वाजेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे. यंदा शुल्क भरण्यासाठी बँक चलानची सुविधा देण्यात आलेली नसून फक्त क्रेडीट किंवा डेबिट कार्डद्वारेच परीक्षा शुल्क जमा करता येईल. खुल्या प्रवर्गासाठी ५५० रुपये, तर अनुसूचित जाती जमातींसह इतर मागासवर्गीय, भटक्या व विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागासवर्गीयांसाठी ४५० रुपये शुल्क असेल. परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.