आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : नोकरीची हमी नसल्याने 'डीएलएड’ साठी फक्त 475 अर्ज, अशी आहे प्रवेश क्षमता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गावर शिक्षक म्हणून काम करता यावे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारी डीएड महाविद्यालये राज्य सरकारने स्थापन केली. एकेकाळी या महाविद्यालयांत प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही रात्रभर रांगा लावत होते. परंतु आज मात्र मुदतवाढ देऊनही अर्ज प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत औरंगाबाद जिल्ह्यात १४६० जागा असून फक्त ४७५ अर्ज आले आहेत. नोकरीची संधी नाही. येणाऱ्या काही वर्षांत नोकरी मिळेल, याची हमीही नाही. खासगी शाळांमध्ये नोकरी लागल्यानंतर राज्याबाहेरील विद्यापीठांतून डीएड केले तरी चालते, अशी स्थिती असल्याने महाराष्ट्रातील तरुणाई पाठ फिरवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
राज्यस्तरीय डीएल.एड प्रवेश निवड, निर्णय, प्रवेश सनियंत्रण समिती पुणे यांच्या वतीने राज्यभरातील डीएलएड प्रथम प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. ३१ मे ते ३० जून पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करायची होती.परंतु मुदतवाढ देवूनही १४६० जागांकरिता ४७५ अर्ज आले आहेत. अशी माहिती डाएटचे प्राचार्य सुभाष कांबळे यांनी दिली. तर शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले की, रोजगाराची संधी नाही, हे प्रमुख कारण आहेच. शिवाय शासकीय डीएड महाविद्यालयांत केंद्रीय पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी कधी होणार? त्यात किती पारदर्शकता असेल. याबाबतही शंका आहेत. खरे तर चांगल्या शिक्षकांची शिक्षण विभागाला गरज आहे. परंतु त्याकडे लक्ष नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
- नोकरीची हमी नसल्याने तरुणाईने प्रवेशाकडे फिरवली पाठ
- ३० जूनपर्यंत होती नव्या नोंदणीची वाढीव मुदत
 
अशी आहे प्रवेश क्षमता
- ४४ डीएलएड एकूण कॉलेज 
- २४ कॉलेज हे शासकीय आहेत.
- १४६० प्रवेश क्षमता आहे.
पूर्वी पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षक बनण्यासाठी डिप्लोमा इन एज्युकेशन (डीएड)होता. आता त्याचे नाव डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन असे आहे.
 
सात वर्षांपासून भरतीसाठी सीईटी नाही 
गेल्या सात वर्षांपासून नोकरीसाठी आवश्यक असलेली सीईटी झालेली नाही. आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी पैसे भरावे लागतात. सध्याचा चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षकपदाचा दर किमान २५ लाख रुपये आहे. खासगी संस्थेत पगाराचीही हमी नाही.  राज्यात सात ते साडेसात लाख डीएड बीएड झालेले तरुण बेकार आहेत. तर विद्यार्थी मिळत नाही म्हणून दहा ते पंधरा कॉलेज बंद झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...